झोपडपट्टीतील पार्टिशनची घरे रहिवाशांसाठी असुरक्षित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

जळगाव - संमिश्र लोकवस्ती असलेल्या तांबापुरा परिसरात हातमजूर, रिक्षाचालक, मिस्तरी आदी गोरगरीब कुटुंबीयांचा रहिवास असून, झोपडपट्टीत अगदी छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये एकत्र कुटुंबे वास्तव्याला आहेत. बहुतांश जुनी पार्टिशनची घरे असल्याने दर पावसाळ्यात प्लास्टिक, ताडपत्री टाकण्याचा कार्यक्रम असतोच. अनेक वर्षांतील उन्हाळे-पावसाळे सहन केलेले लाकडी पार्टिशन आणि खांबांना वाळवी लागून आतूनच कुंजून गेलेल्या खांबांवर असणारे छत केव्हाही कोसळण्याची शक्‍यता असल्याने परिसरातील रहिवाशांचे जीवन असुरक्षित बनले आहे.

जळगाव - संमिश्र लोकवस्ती असलेल्या तांबापुरा परिसरात हातमजूर, रिक्षाचालक, मिस्तरी आदी गोरगरीब कुटुंबीयांचा रहिवास असून, झोपडपट्टीत अगदी छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये एकत्र कुटुंबे वास्तव्याला आहेत. बहुतांश जुनी पार्टिशनची घरे असल्याने दर पावसाळ्यात प्लास्टिक, ताडपत्री टाकण्याचा कार्यक्रम असतोच. अनेक वर्षांतील उन्हाळे-पावसाळे सहन केलेले लाकडी पार्टिशन आणि खांबांना वाळवी लागून आतूनच कुंजून गेलेल्या खांबांवर असणारे छत केव्हाही कोसळण्याची शक्‍यता असल्याने परिसरातील रहिवाशांचे जीवन असुरक्षित बनले आहे.

शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण होते. जुने बांधकाम बघूनच त्या घरमालकाला धास्ती घातली जाते. मात्र, झोपड्यांमध्ये दुर्घटना होऊन मृत्यू झाल्यावरही कुणी ढुंकायला येत नाही, याचा अनुभव आज आला. मेहरुण परिसरातील तांबापुरा हा चार महापौर, उपमहापौर निवडून देणारा एकगठ्ठा मतदानाचा परिसर आहे. नागरी सेवासुविधांची या भागात नेहमीच येथे वानवा असते. पोटाला लागणाऱ्या भाकरीची भ्रांत असल्याने मूलभूत सेवा सुविधा मागणारेही फारसे कुणी नाही. त्यामुळे गरज म्हणून गेल्या काही वर्षांत काहींनी पार्टिशनची घरे तोडून स्वत:च पक्की घरे होत्या त्याच जागेत उभी केली. मात्र, तरी निम्म्याहून अधिक घरे पार्टिशनची, लाकडी खांबावर ठोकलेल्या फळ्यांवर पत्र्यांचे शेड अशा अवस्थेतच आहेत. छोटछोट्या घरात वृद्ध माता-पित्यासंह पती-पत्नी लहान मुलांचा संसार एकत्रच वास्तव्याला आहे. काहींकडे तर पूर्ण कुटुंबच कामाला जाणार तेव्हा चूल पेटते अशी परिस्थिती असल्याने दारिद्य्राचे चित्र याठिकाणी दिसते. आहे त्याच जागेत तशाच घरांमध्ये राहावे लागत असल्याने रहिवाशांचा नाइलाज आहे.

एकत्र कुटुंबामुळे विस्तार
घर लहान असले, तरी कुटुंब एकत्र असते. एकाच घरात आठ-दहा लोक वास्तव्याला असल्याने वर्ष-पाच वर्षांतून भिशी उठली, थोडा हात मोकळा झाला की, पार्टिशनच्या जागी भिंती उभ्या करून त्यावर वरती पार्टिशनचे घर उभे राहते. खाली आणि वर दोन्ही भावांचा संसार एकाच ठिकाणी वास्तव्यास असतो. पावसाच्या पाण्यापासून बचावाला प्लास्टिक कागदपत्र्यांवर टाकून गळके छत बंद होते. मात्र, चार-पाच वर्षांतच घराच्या लाकडाला वाळवी लागून ते कुजते. त्यातून जिवावर बेतणाऱ्या दुर्घटना घडतात.

पत्र्यावर दगडांचा खच 
पावसाळ्यापूर्वी सुटणाऱ्या वाऱ्यात बेमोसमी पावसात छताचे पत्रे उडून जातात, म्हणून त्यावर दहा ते बारा किलो वजनाचे मोठमोठे दगड ठेवून पत्रे उडून जाऊ नये यांची सोय केली जाते. पार्टिशनच्या घरांवर पन्हाळी पत्रे पावसाळ्यात गळतात, रात्री बे-रात्री पाऊस झाल्याने छत गळत असताना कुटुंबाला रात्र जागून काढावी लागते. परिणामी छत गळू नये यांसाठी गावखेड्याप्रमाणे पावसाळा लागताच प्लास्टिक कागद, ताडपत्री अंथरण्यात येते. ऐपतीप्रमाणे आणि मिळेल त्या प्रमाणे जो-तो छतावर प्लास्टिक टाकतो. 

भीती घालण्यासाठी महापालिकाच...
बालकाचा मृत्यू झाल्याने, पार्टिशनची घरे किती धोकादायक आहेत, हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेगळे सांगावे लागणार नाही. दुर्घटना घडल्यानंतर जाग येणाऱ्या महापालिकेचा अभियंता, परिसरातील नगरसेवक, कार्यकर्त्यांना घेऊन सोमवारी या परिसरात फेरफटका मारेल. नंतर संबंधित पुढारी ही घरे पाडली जाणार असल्याची अफवा पसरवून अशिक्षित रहिवाशांना भीती घालून आपल्या पारड्यात ओढून घेईल. वर्षभरावर महापालिका निवडणुका आहेतच. येणारे-जाणारे मात्र, छतांवरचे कागद आणि त्यावरील दगडी वजन कमी करा, असा सल्ला देणार नाहीतच. भीती घातली, की आपलेसे करता येते, या सूत्राचा अवलंब तांबापुरात होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: jalgaon news slum