दिवाळी सुटीतील मामाच्या गावाचा प्रवास महागणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

जळगाव - सुट्या लागल्या की मुलांना ओढ लागते गावाला जाण्याची. त्यातच मामाच्या गावाला जाऊन दिवाळीचा आनंद घ्यायचा; पण यंदाच्या दिवाळीत सुखकर प्रवास करीत जाणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसचा फंडा आजमावत यंदा देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जळगाव - सुट्या लागल्या की मुलांना ओढ लागते गावाला जाण्याची. त्यातच मामाच्या गावाला जाऊन दिवाळीचा आनंद घ्यायचा; पण यंदाच्या दिवाळीत सुखकर प्रवास करीत जाणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसचा फंडा आजमावत यंदा देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्य परिवहन महामंडळासाठी लग्नसराई, दिवाळी हा गर्दीचा हंगाम मानला जातो. सुटीच्या कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरिता एकंदरीत हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी जादा बसचे नियोजनही केले जाते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून महामंडळाने जादा बससोबतच हंगामी भाडेवाढीचा फंडा देखील सुरू केला आहे. आरामदायी आणि सुखकर प्रवासाचे ब्रीद घेऊन धावणाऱ्या ‘एसटी’ला अपेक्षित असलेले उत्पन्न मिळत नसल्याने हंगामी भाडेवाढ करून भरपाई काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदाची ही भाडेवाढ साध्या (परिवर्तन) बससह राधी रातराणी, निमआराम, वातानुकूलित (शिवनेरी व शिवशाही) या बससेवेसाठी केली आहे.

प्रवासी मिळेना, तरीही भाडेवाढ
‘एसटी’ महामंडळाकडून हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी तीन वर्षांपासून दिवाळीत हंगामी भाडेवाढ केली जात आहे. महामंडळाने २०१५ मध्ये भाडेवाढीचा प्रथम प्रयोग केला. पण, या दोन वर्षांत महामंडळाच्या बसला मिळणारा प्रतिसाद अल्प राहिला होता. एकीकडे भाडेवाढ पण, सुविधा त्याच असल्याने प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती दिल्याने अपेक्षित असलेले उत्पन्न महामंडळाला मिळू शकले नव्हते. तरी देखील यंदा पुन्हा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यावर्षी किती प्रतिसाद मिळतो हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

१७ दिवसांसाठी भाडेवाढ
नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले चाकरमानी दिवाळीच्या सुटीच्या काळात घरी येत असतात. ही गर्दी पाहता दसरा- दिवाळीच्या कालावधीत खासगी बसची प्रचंड भाडेवाढ केली जाते. हाच फंडा यंदा राज्य परिवहन महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिवाळी सुरू होण्याच्या तोंडावर म्हणजे १४ ऑक्‍टोबरपासून भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. ही हंगामी वाढ परतीचा प्रवास संपेपर्यंत म्हणजे ३१ ऑक्‍टोबर अशा सतरा दिवसांची भाडेवाढ आहे. एक नोव्हेंबरपासून पूर्वीप्रमाणेच मूळ प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.

असे असेल हंगामी भाडे (१४ ते ३१ ऑक्‍टोबर)    
 मार्ग (जळगावहून)    सध्याचे भाडे    हंगामी भाडे 

 जामनेर    ४४    ४९ 
 पाचोरा    ५७    ६३ 
 भडगाव    ६९    ७६ 
 चाळीसगाव    १०७    ११८ 
 अमळनेर    ६९    ७६ 
 चोपडा (विदगावमार्गे)    ६३    ६९ 
 यावल (विदगावमार्गे)    ५७    ६३ 
 रावेर    ८२    ९० 
 भुसावळ    ३२    ३५ 
 एरंडोल    ३८    ४२ 
 धरणगाव    ३८    ४२ 
 पारोळा    ६३    ७० 
 धुळे    १०१    १११
 औरंगाबाद    १७६    १९५
 मालेगाव    १५१    १६७ 
 पुणे (दिवसा)    ४२२    ४६६ 
 पुणे (रातराणी    ४९९    ५४९
 नाशिक    २७१    २९९ 
 मुंबई (रातराणी)    ५४४    ५९९ 
 अकोला    २०८    २२९

Web Title: jalgaon news st bus rate increase