नववीतल्या तुषारने कल्पकतेतून बनवल्या विविध वस्तू

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मला नेहमीच काही ना काही गोष्टी बनवायला आवडतात. त्यामुळे मी रिकाम्या वेळेत अशा वस्तू बनवत असतो. मला मोठे होऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व्हायचे असून स्वतःचे नवीन काहीतरी बनवायचे आहे.
 - तुषार युवराज मयाचार्य, मांदुर्णे.

पिलखोड (ता. चाळीसगाव): शहरातल्या मुलांना मिळालेला फावला वेळ हा कॉम्प्युटर व मोबाईल गेम्स खेळण्यात घालवतात. मात्र, ग्रामीण भागातल्या तुषारने मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करीत आपल्या कल्पकतेतून विविध वस्तू साकारल्या आहेत.

मांदुर्णे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील नववीत शिकणारा तुषार युवराज मयाचार्य या पंधरा वर्षीय मुलाने स्वतःच्या कल्पकतेतून कोळपणी यंत्र बनवले आहे. त्याच्या वडिलांची शेती आहे. कुटुंबातल्या सदस्यांना हातभार लागावा यासाठी तो सुटीच्या दिवशी शेतात जातो. निंदणीसाठी लागणारे मजूर आणि वेळ यावर काहीतरी मार्ग काढावा असा त्याने विचार केला. मग त्याने सायकलीपासून कोळपणी यंत्र तयार करण्याची शक्कल लढवली. घरात एक जुनी सायकल पडलेली होती. तिचे पुढचे चाक नसल्याने त्याने मागच्या चाकाचा वापर केला. आधी त्याने बाजरी पिकासाठी अर्धा फुटी कोळपणी यंत्र तयार केले होते. त्यांनतर त्याने त्यात बदल करीत सव्वा फुटी कोळपणी यंत्र कापूस पिकासाठी तयार केले आहे. मोडलेल्या सायकलीपासून त्याने हे यंत्र बनवले आहे. या यंत्राचा शोध जरी नवा नसला, तरी त्याने ते स्वतः बनवल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.

कोळपणी यंत्रात करणार बदल...
सध्याच्या कोळपणी यंत्रात काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी तुषारच्या डोक्यात नवे विचार सुरू आहेत. सध्याच्या यंत्राला पुढचे चाक नसल्याने त्याला चाक बसवणार आहे. शिवाय त्याला विद्युत मोटारीची जोड देणार आहे. या अशा काही बदलांसह लवकरच नवे कोळपणी यंत्र बनवणार असल्याचे त्याने 'सकाळ'ला सांगितले.

या वस्तू बनवल्या आहेत...
तुषार सांगतो की, त्याला नेहमीच नवनवीन गोष्टींचं आकर्षण राहिले आहे. त्याला दैनंदिन वापरात येणाऱ्या गोष्टींबद्दल वेगळं अप्रूप आहे. त्यामुळे त्याने टाकाऊ वस्तूंपासून कुलर, टेबल फॅन व पत्रा वापरून बुलडोजर बनवले आहे.

आजोबांच्या वस्तूंचा केला वापर...
तुषारची कौटुंबिक परिस्थिती तशी साधारण आहे. त्याच्या कुटुंबात वडील, आई, मोठा भाऊ, मोठी बहीण असे सदस्य आहेत. त्याचे आजोबा विश्वनाथ मयाचार्य हे धुळ्यात शिक्षक होते. ते विद्यार्थ्यांना सुतारकामाचे तांत्रिक शिक्षण देत होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. आजोबांच्या घरी पडलेल्या सुतारकामाच्या वस्तू त्याने कोळपणी यंत्र तयार करण्यासाठी उपयोगात आणल्या आहेत.

Web Title: jalgaon news student tushar mayacharya making agriculture things