‘गुरुजींचा केला आचारी, पुरे झाली लाचारी...’

जळगाव - विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूकमोर्चात सहभागी शिक्षक.
जळगाव - विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मूकमोर्चात सहभागी शिक्षक.

जळगाव - ‘ऑनलाइन’ कामे बंद करावीत, अशैक्षणिक कामांमधून मुक्‍तता व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘गुरुजींचा केला आचारी, पुरे झाली आता लाचारी’, ‘शिक्षक झाले ऑनलाइन, शिक्षण केले दिशाहीन’ यांसारखे बॅनर घेऊन निषेध नोंदविण्यात आला होता.

जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मूकमोर्चात शिक्षकांच्या २१ संघटनांचा सहभाग होता. जिल्ह्यातील प्राथमिकच्या तीन हजारापर्यंत शिक्षकांनी यात सहभाग नोंदवून निषेध व्यक्‍त केला. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून दुपारी एकला मोर्चाला सुरवात झाली. सुरवातीला चाळीसगाव तालुक्‍यातील ऑनलाइनच्या कामातून आत्महत्या करणारे शिक्षक आबासाहेब चौधरी यांच्यासह ऑनलाइन व पोषण यातून त्रासून आजपर्यंत बळी ठरलेल्या ५० शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मूकमोर्चाला सुरवात होऊन टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. येथे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना महिला शिक्षिका पाकिजा पटेल, विद्या पाटील, छाया सोनवणे, संगीता मगर व आपशा तरन्नुम या पंच मंडळाने निवेदन दिले. मोर्चात शिक्षक संघाचे विलास नेरकर, शिक्षक सेनेचे ईश्‍वर सपकाळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे सुनील पाटील, पदवीधर शिक्षक महासंघाचे विजय बागूल, भगवान भराडे, रवींद्र पाटील, अरुणा उदावंत, मनीषा पाटील या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो शिक्षकांचा सहभाग होता. 

आमदार भोळेंचा पाठिंबा
जळगाव शहरातील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी व शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाच्या ठिकाणी शिक्षकांना पाठिंबा दर्शविला. तसेच शिक्षकांच्या मागण्या शासनाकडे मांडणार असून, मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कायम सोबत राहणार असल्याचे आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले. पाटील यांनी शिवसेना ही शिक्षकांच्या कायम पाठीशी असून, मागण्या मान्य झाल्या नाही तर शिक्षकांसाठी शिवसेना यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

स्वतंत्र ऑपरेटर नेमावा
अविनाश मोरे (फुपनगरी) - शिक्षकाचे शिकवणे कमी आणि ऑनलाइनचे काम जास्त झाले आहे. यामुळे गुणवत्ता घसरत आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या येत असल्याने ऑनलाइनची कामे वेळेवर होत नाहीत. याकरिता केंद्राचे काम करणारा स्वतंत्र डेटा ऑपरेटर नेमायला हवा.

कामे करायची, की शिकवायचे?
भारती पाटील (जि. प. बॉईज क्रमांक ३, पारोळा) - शिक्षण विभागाकडून येणारा प्रत्येक आदेश ‘व्हॉटस्‌ॲप’वर पाठविण्यात येतो. प्रत्येकवेळी ‘व्हॉटस्‌ॲप’ सुरूच राहील असे नाही. यामुळे बऱ्याचदा उशिरापर्यंत संदेश पाहिला जातो. त्याद्वारे तत्काळ माहिती मागविलेली असते. ती माहिती ऑनलाइन आणि ऑफलाइनही द्यावी लागते. इतका वेळ यात जात असेल, तर शिकवायचे कधी?

साइट हॅंग होत असल्याने अडचणी
दिलीप पाटील (मुक्‍ताईनगर) - ऑनलाइन काम करणे जमत नाही. हे काम करण्यासाठी शिक्षकांना दिवसा शाळा आणि सायंकाळी कॅफेवर जावे लागते. वेबसाइट हॅंग होत असल्याने बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत माहिती भरून द्यावी लागते. वेबसाइट व्यवस्थित सुरू राहिल्यास माहिती भरणे अवघड जाणार नाही.

अशा आहेत मागण्या
शाळास्तरावर करण्यात येणारी ‘ऑनलाइन’ कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी, शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णयात दुरुस्ती व्हावी, संगणक अर्हता पास होण्याची मुदत डिसेंबर २०१८ अखेर वाढवून मिळावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, २३ ऑक्‍टोबरच्या निवड श्रेणी/वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, शालेय पोषण आहार शिक्षकांना मुक्‍त करा तसेच अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्‍त करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com