महिनाभर कुटुंबापासून दूर राहून मिळविली चोरीस गेलेली कार! 

महिनाभर कुटुंबापासून दूर राहून मिळविली चोरीस गेलेली कार! 

जळगाव - कर्ज काढून व्यवसायासाठी घेतलेली नवी कोरी ‘इनोव्हा’ कार तेराव्या दिवशीच चोरीला गेल्यानंतर प्रचंड अस्वस्थ झालेल्या गाडीमालकाने या स्थितीचा न डगमगता सामना केला आणि गाडीच्या तपासासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावत तब्बल २८ दिवस घराबाहेर राहत गाडी परत मिळवली. सोबतच कारचोरट्यालाही अटक करून देण्यात मोलाची भूमिका बजावली. न्यायालयाच्या आदेशानंतर चक्क पोलिस ठाण्यानेही ही कार धुवून- पुसून मालकाच्या स्वाधीन केली, त्यावेळी कारमालकाच्या भावना दाटून आल्या होत्या. 

पुणे येथील रहिवासी शाकीर तांबोळी यांनी ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी लग्नाचा सीझन पाहून कर्जाने इनोव्हा कार खरेदी केली. कार घेतल्यावर अवघ्या तेराव्या दिवशीच ती चोरीला गेली. शकील सय्यद युसूफ (रा.बुलडाणा) याने जळगावी लग्नाला जायचा बहाणा करून भाड्याने घेतलेली कार ४ एप्रिल २०१७ला जळगाव- जामनेर रस्त्यावर चालक निसार शब्बीर शेख याला खाली उतरवून पळवून नेली. औरंगाबादमार्गे बुलडाणा व नंतर जालना येथे जाऊन ती कार अवघ्या नव्वद हजारांत विकून तो मोकळा झाला. व्यवसायाचे साधन असलेली कार चोरीला गेल्यावर मात्र शाकीर तांबोळी यांनी वाहन चोराचा शोध घेण्याचा निश्‍चय केला. गेल्या २८ दिवसांपासून ते घर-कुटुंब सोडून वाहनाचा शोधच घेत नव्हते तर, जळगाव-पुणे पोलिसांसोबत चक्क तपासातही सहभागी झाले. 

तांबोळी यांनी चोरटा शकीलच्या कुटुंबासह त्याच्या अख्ख्या खानदानाची कुंडली जमा करून पोलिसांकडे सोपवली. निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी त्याच्या शोधात औरंगाबाद-जालना येथे असताना शकीलच्या चोर कुटुंबाच्या मागं-पुढं शाकीर तांबोळी राहिले, माहितीचे संकलन, आदान-प्रदान सुरूच होते. जळगावहून औरंगाबाद, बुलडाणा, हैदराबाद व नंतर आसामपर्यंत कारच्या शोधार्थ मजल गाठली. अखेर कार मिळविल्यावर पोलिसांनीही शाकीरच्या चिकाटीचे कौतुक करत कार त्यांना सन्मानाने परत दिली.

धमकीही निरुपयोगी
शकीलने चोरी केलेली कार सहजासहजी परत मिळतच नाही, मुस्लीमबहुल चोरवस्त्यांमध्ये त्याचा रहिवास असल्याने तेथे पोचणे अशक्‍य होते. पोलिस पोचलेच तर खाली हात परतावे लागते, अशी चोरबाजारात शकीलची ख्याती आहे. म्हणूनच गाडीमालक तांबोळींना पुढे करण्यात आले. चोरट्याच्या घरापर्यंत पोचल्यावर त्याचा लहान भाऊ समीर व मेहुणा मोहसीन यांना शाकीर तांबोळी कारच्या शोधात आल्याचे कळाल्यावर त्यांनी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यावर तांबोळीने चोरून आणलेली कार, मला परत करा मी आणखी १ लाख रुपये देतो, पोलिसांत तक्रारही होणार नाही. प्रकरण आपसांत मिटवून घेऊ, असा प्रस्ताव पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसारच दिला. कार कुणाला विकली व कुठे आहे, चोरटा शकीलही मिळत नसल्याने पोलिसांनी हा ‘हनी ट्रॅप’ लावला. मात्र दोघेही सावध झाले. पोलिसांना जे हवे होते ते मिळाले म्हणून त्यांचा पिच्छा सोडत अखेर शकीलला अटक केली. 
आजवर मास्टरमाईंड आरटीओ एजंट सय्यद शकील सय्यद युसूफ (रा. बुलडाणा) यासह सय्यद कुर्बान, आबेदखान ऊर्फ गुड्डू नासिर खान (दोघे रा. औरंगाबाद), एजाज जलालुद्दिन काजी, नाजीम बेग ऊर्फ नम्मू यांची नावे निष्पन्न झाली असून आबेद व नासीर सहित आता समीरचा शोध पोलिस पथके घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com