तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम होऊ नका - तुषार गांधी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

जळगाव - नव्या गरजा आपणच निर्माण केल्या, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक नव्हते तेव्हाही संवाद साधला जात होताच ना. आज तंत्रज्ञानाव्दारे पटकन संवाद साधला जातो, पण त्यातील संवेदना हरवली आहे. तांत्रिक गरजांशिवाय जगणे शिकले पाहिजे. तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम बनू नका, तंत्रज्ञानाला तुमचा गुलाम बनवा आणि स्वतः:चा शोध घ्या, असा मौलिक सल्ला महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी आज युवकांना दिला. 

जळगाव - नव्या गरजा आपणच निर्माण केल्या, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक नव्हते तेव्हाही संवाद साधला जात होताच ना. आज तंत्रज्ञानाव्दारे पटकन संवाद साधला जातो, पण त्यातील संवेदना हरवली आहे. तांत्रिक गरजांशिवाय जगणे शिकले पाहिजे. तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचे गुलाम बनू नका, तंत्रज्ञानाला तुमचा गुलाम बनवा आणि स्वतः:चा शोध घ्या, असा मौलिक सल्ला महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी आज युवकांना दिला. 

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि गांधीयन सोसायटीच्या माध्यमातून नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प सुरू झाला आहे. आज दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात युवकांच्या प्रश्नांना तुषार गांधी यांनी मोकळेपणांनी उत्तरे दिली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी युवकांनी महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, नथुराम गोडसे आणि फाळणीच्या काळातील संदर्भ घेत अनेक प्रश्न विचारले. तुषार गांधी यांनी सविस्तर उत्तरे देऊन युवकांचे समाधान केले. तुषार गांधी म्हणाले, की गांधीजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नेहमी पुढे असत. त्यांच्या काळात असलेल्या टेलिग्राफ या तंत्राचा ते सर्वाधिक वापर करत. नवतंत्रज्ञानाला त्यांचा विरोध कधीच नव्हता. 

महात्मा गांधीचे पणतू म्हणून जगताना तुम्हाला कसे वाटते याप्रश्‍नावर तुषार गांधी म्हणाले, महात्मा गांधी वटवृक्षाच्या छायेत वाढणारे मी एक रोपटे आहे. त्यांची छाया मी नाकारू शकत नाही. महानतेचा वारसाहक्क मिळत नाही, तो कमवावा लागतो. गांधीजी ऍग्रेसिव्ह होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, हो गांधीजी ऍग्रेसिव्ह होते, पण त्यांची आक्रमकता कृतीतून व्यक्त होत नव्हती, त्यांची आक्रमकता ते विचारातून व्यक्त करत होते. गांधीजींनी विकसित केलेली "नयी तालीम' शिक्षण व्यवस्था आजच्या काळासाठी उपयोगी आहे. आज दोन-दोन पदव्या मिळाल्यानंतरही नोकरी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. उच्चशिक्षण घेतलेल्या मुलांच्या विकासाला मर्यादा येतात कारण त्यांच्यातील कौशल्यांचा विकास झालेला नसतो. गांधीजींची नयी तालीम मुलांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य देते. भगतसिंगाच्या फाशीच्या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, भगतसिंगांच्या संदर्भात महात्मा गांधींनी चार पत्र लिहिली. त्यामध्ये भगतसिंग तुमचा दोषी आहे, त्याला शिक्षा करा मात्र फाशी देऊ नका, देशाला त्याची गरज आहे असा संदर्भ पत्रात असल्याचे तुषार गांधी यांनी युवकांशी बोलताना स्पष्ट केले. संवादाच्या शेवटी अश्‍विन झाला यांनी आभार मानले. 

Web Title: jalgaon news tushar gandhi