नाशिक, औरंगाबाद शहरापेक्षाही जळगावचा चांगला विकास करू

नाशिक, औरंगाबाद शहरापेक्षाही जळगावचा चांगला विकास करू

जळगाव - येथील महापालिकेस ‘हुडको’च्या कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्याचा संकल्प आहे. त्यात जळगाव शहरात समांतर रस्ते, शहर स्वच्छ व सुंदर करण्याची योजना आहे, जळगावचे पोटेन्शिअल चांगले आहे. त्यामुळे जळगावचा विकास नाशिक, औरंगाबादपेक्षाही अधिक गतीने करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना तयार केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित ‘सिद्धी ते संकल्प’ या उपक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यावेळी उपस्थित होते.

श्री. निंबाळकर यांनी सांगितले, की महापालिकेवर सुमारे ३४१ कोटी रुपये ‘हुडको’चे कर्ज आहे. या कर्जफेड प्रकरणाची येत्या ११ जानेवारीला सुनावणी आहे. यावेळी वनटाइम सेटलमेंट होईल, असा अंदाज आहे. महापालिकेने मुद्दल रकमेपेक्षा अधिकचे पैसे व्याज म्हणून ‘हुडको’ला दिले आहेत. जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही करू. महापालिकेचे उत्पन्नवाढीसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत, त्या अमलात आणल्या जातील.

महाविद्यालयीन युवकांसाठी नशिराबाद ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठदरम्यान बस सुरू करण्यात येईल. शहरात मूलभूत सोयी-सुविधांसाठी पंचवीस कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. त्याला एक-दोन दिवसात मंजुरी मिळेल. अमृत मलनिस्सारण योजनेसाठी १३८ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर केला आहे.

जळगावकरांना रोज पाणी
शहराच्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी २४९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून जळगावकरांना आगामी वर्षात दररोज पाणी देण्यासंदर्भात नियोजन केले आहे.

समांतर रस्त्यांसाठी शंभर कोटी
नशिराबाद ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंतच्या समांतर रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तो मंजूर होऊन समांतर रस्त्यांच्या कामांना सुरवात होईल.

महापालिकेची अत्याधुनिक शाळा
महापालिकेची एक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करून त्यात सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाईल. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत ज्याप्रकारे शिकविले जाते त्याच प्रकारचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत देण्याचा प्रयत्न असेल.

स्वच्छतेचा प्रारूप आराखडा
शहर स्वच्छतेसाठी तीस कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. यामध्ये कचऱ्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. 

इच्छादेवी चौकातील अतिक्रमण काढणार
शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अजिंठा चौफुलीचे सुशोभीकरण येत्या १५ दिवसांत सुरू करू. सोबतच इच्छादेवी चौकातील अतिक्रमण काढण्यात येईल. हा चौक मोठा केल्यानंतर वाहतुकीची कोंडी अजिबात होणार नाही.

मालमत्तेचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग
शहरातील मालमत्तांचे सॅटेलाइटद्वारे मॅपिंग केले असून, त्यांचे वर्गीकरणही झाले आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे फोटो काढणे बाकी आहे. लवकरच ते पूर्ण होईल. मालमत्ता पाहून त्यांना घरपट्टी, विविध प्रकारच्या करांची संगणकीय बिले दिले जातील. मालमत्ता करातून ४३ कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळेल. ४८ कोटींची थकबाकी नागरिकांकडे आहे. यासह इतर मार्गांनी उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न आहे. असे एकूण महापालिकेचे उत्पन्न १४० कोटी रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधा देता येणे शक्‍य होईल.

पाणी पातळी वाढविण्यात भारतात जळगाव प्रथम
जलयुक्‍त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २३२ गावांची निवड केली गेली. त्यासाठी १२७ कोटी रुपये निधी खर्च झाला. या गावांमध्ये ७४०४ कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे जिल्ह्यात ३६ हजार ११८ टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे ५८६६७ हेक्‍टर क्षेत्राला एक पाण्याची पाळी देता येणार होती. २०१६-१७ मध्ये झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे १.६ मीटरने जिल्ह्याची पाणी पातळी वाढली. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सिंचनासाठी दोन वेळा पाणी देता येणे शक्‍य होईल. तीन वेळा पिके शेतकरी घेऊ शकतील. सूक्ष्मसिंचन अधिक प्रमाणात होत असल्याने जळगाव भारतात प्रथम क्रमांकावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com