चाळीसगाव : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

शिवनंदन बाविस्कर
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

या घटनेची माहिती गावात कळाल्यावर मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झाली. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली(विवाहित) असा परीवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : उंबरखेडे(ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असलेल्या अलकाबाई अहिरे यांच्यावर काल (ता. 11) सायंकाळी मांजरी शिवाराच्या वरच्या भागात असलेल्या त्यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

अलकाबाई गणपत अहिरे ( वय 47) या उंबरखेडे येथील रहिवासी आहेत. त्यांचे शेत पिंपळवाड म्हाळसा व तामसवाडी शिवाराच्या मधोमध मांजरीच्या वरच्या भागात आहे. आज सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अलकाबाई यांच्या मानेवर बिबट्याने गंभीर हल्ला करत ठार केले. अलकाबाई यांचा मुलगा त्यांना शेतात घ्यायला गेला असता, त्याला त्याच्या आईच्या चपला अस्ताव्यस्त दिसून आल्या व पुढे जाऊन पाहिले तर त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. 

या घटनेची माहिती गावात कळाल्यावर मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झाली. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली(विवाहित) असा परीवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

काही दिवसांपूर्वी याच उंबरखेडे गावातील आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर काल(ता. 11) झालेली या परिसरातली ही सलग दुसरी घटना आहे.

Web Title: Jalgaon news women killed on leopard attack