खाकीने घेतले छत्रपतींच्या युद्धनीतीचे धडे

jalgaon police in cinema
jalgaon police in cinema


जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन फौजफाट्यासह आज सिनेमागृहात धडकले. दीड-दोनशे गणवेशातील पोलिसाचा ताफा खानदेश सेंट्रलमध्ये एकवटल्याने परिसरात अनेकांची पाचावर धारण बसली. मॉलमध्ये फिरणाऱ्या मजनुंनी तर धूम ठोकली. सामान्य नागरिकांसह खानदेश सेंट्रलमधील व्यावसायिकांच्याही कपाळावर आठ्या आल्या..कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध हजेरी घेतल्यावर हा सर्व ताफा बघता-बघता थेट सिनेमागृहात शिरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेवर आधारित "फतेशिकस्त' हा चित्रपट बघण्यासाठी पोलिसदल आल्याचे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

दिग्दर्शक दिगपाल लांजेकर दिग्दर्शित "फतेशिकस्त' हा मराठी चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि यशस्वी युद्धनीतीवर आधारित या चित्रपटाचा मनमुराद आनंद आज जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी लुटला. महाराजांनी लाल महालावर हल्ला चढविण्यापूर्वी त्यांची गोपनीय यंत्रणा राबविणारा बर्हिजी नाईक ज्या पद्धतीने वेशांतर करून एखाद्या हल्ल्याच्या पूर्व तयारीची चोख जबाबदारी पूर्ण करतो, ज्यामुळे शाहिस्तेखानाला त्याच्याच महालात शिरून शिकस्त देण्यात सैन्य यशस्वी होते. उपलब्ध मनुष्यबळात चोख कामगिरी बजावणाऱ्या गोपनीय यंत्रणेचे महत्त्व या चित्रपटातून पोलिस दलास ज्ञात झाले. कुठलाही तपास आणि कारवाई करताना गोपनीय यंत्रणेचे कार्याचे काय महत्त्व असते, याचा उलगडा झाला. 

पोलिस कुटुंबांतील पात्र 
चित्रपटात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सुनील कुराडे यांचा पुतण्या संदीप कुऱ्हाडे या चित्रपटात खिरोजीची भूमिका वठवत असून, आज संदीप कुऱ्हाडे चित्रपटगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होता. 

पोलिसदलासाठी स्फूर्तिदायक 
चित्रपट बघितल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात. मातीशी नाते असणाऱ्या प्रामाणिक सैन्याच्या जोरावर छत्रपतींनी राबवलेली युद्धनीती अप्रतिम आहे. खास करून पोलिसदलासाठी स्फूर्तिदायक बाब म्हणजे महाराजांची गोपनीय शाखा ज्या पद्धतीने कार्य करते ते आधुनिक पोलिसदलासही प्रेरणादायक आहे. दिग्दर्शक, निर्माते यांनी पोलिसदलासाठी एकत्रितपणे चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पोलिसदलाने आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com