शिक्षकांचे असेही दातृत्व 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

अक्षदा रवींद्र राजपूत हिला हृदयाचा त्रास आहे. तिच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून उपचार सुरू आहेत. सध्या तिला मुंबई येथील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय योजनेतून तिची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. 

वाकोद (ता. जामनेर) ः विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासोबत वेगळे उपक्रम राबविणारे शिक्षक पाहण्यास मिळतात. यात अनेकजण गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलत असतात. पण याही पेक्षा थोडे वेगळे करत विद्यार्थीनीला हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचे काम शिक्षकाने केले आहे. 

पळासखेडा मिराचे (ता. जामनेर) येथील नीळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांने शिक्षकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. नि. पं. पाटील विद्यालय पळासखेडे (मिराचे) मधील आठवीतील विद्यार्थिनी अक्षदा रवींद्र राजपूत हिला हृदयाचा त्रास आहे. तिच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून उपचार सुरू आहेत. सध्या तिला मुंबई येथील व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय योजनेतून तिची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. 

आर्थिक परिस्थिती नसल्याने घेतला पुढाकार 
सदर विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्याल लागणारा इतर खर्च घरच्यांकडून पेलवणारा नाही. यामुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून 16 हजार 620 रुपये आर्थिक मदत करण्यात आली. ती रक्कम शाळेच्यावतीने स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व श्‍यामसिंग राजपूत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुख्याध्यापक ए. के. पाटील व शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड यांसह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon school girl student help teacher