कार्तिकी एकादशीला निघणारा एकमेव रामरथ...कसा निघतो रथ जाणून घ्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

जळगावमधील जुन्या गावातील रामपेठ परिसरातील श्रीराम मंदिर म्हणजे जळगावकरांचे ग्रामदैवत. संस्थानतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. पण, या धार्मिक उत्सवांतील सर्वांत मोठा उत्सव आणि 147 वर्षांची परंपरा लाभलेला रथोत्सव. देशभरात कार्तिक प्रबोधिनी एकादशीला एकमेव निघणाऱ्या या श्रीराम रथोत्सवाविषयी... 

जळगावमधील जुन्या गावातील रामपेठ परिसरातील श्रीराम मंदिर म्हणजे जळगावकरांचे ग्रामदैवत. संस्थानतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. पण, या धार्मिक उत्सवांतील सर्वांत मोठा उत्सव आणि 147 वर्षांची परंपरा लाभलेला रथोत्सव. देशभरात कार्तिक प्रबोधिनी एकादशीला एकमेव निघणाऱ्या या श्रीराम रथोत्सवाविषयी... 

जळगावच्या जुन्या गावातील रामपेठेतील प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे ग्रामदैवत मानले जाते. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी शुद्ध प्रतिपदेपासून वहनोत्सव साजरा होत असतो. जलग्राम प्रदक्षिणा घालताना गावात ठिकठिकाणी भजन- भारूड, पानसुपारीचा कार्यक्रम होतो. वहनावर विविध प्राणिमात्रांसह देवी-देवतांच्या मूर्ती असतात. भारतीय संस्कृती मानवाबरोबरच प्राणिमात्रांचेही ऋण मानते. त्याचेच प्रतीक म्हणजे हा वहनोत्सव मानला जात आहे. यात घोडा, हत्ती, सिंह, मोर, शेषनाग, सरस्वती, चंद्र, सूर्य, गरुड, मारुती अशी दहा दिवस वहने निघतात. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला रथोत्सव साजरा झाल्यानंतर कार्तिकी शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवाचा समारोप होतो. यामुळे जळगावनगरीत पंधरा दिवसांचा दीपोत्सव व आनंदोत्सव साजरा होत असतो. 

अशी सुरू झाली परंपरा 
श्रीराम मंदिर संस्थानचे प्रथम गादिपती मूळ सत्पुरुष श्री आप्पा महाराज हे मेहरूण तलावाजवळ ध्यानस्थ बसलेले असताना, त्यांना त्या अवस्थेत साक्षात मुक्ताबाईचा (संत शिरोमणी) साक्षात्कार झाला. त्यांनी दृष्टान्त देऊन वहन व रथोत्सवाची प्रेरणा आप्पा महाराजांना दिली. त्या वर्षापासून म्हणजे इसवी सन 1872 पासून आजतागायत 143 वर्षांची परंपरा जोपासत जळगावचा हा रथोत्सव अद्ययावतपणे सुरू आहे. कार्तिकी शुद्ध एकादशीला रथाची गाव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर रात्री सवाद्य रथावरील देव उतरवून पुनश्‍च मंदिरात नेले जातात. कार्तिकी शुद्ध द्वादशीला शेवटचे वहन म्हणून कृष्णाची रासक्रीडा असते. गोप-गोपिकांच्या मूर्ती वहनावर सजविल्या जातात. वहनाला ठिकठिकाणी "पानसुपारी' असते. "पानसुपारी' म्हणजे यजमानपद. त्या दिवशी देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात. त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. देवांच्या वतीने मंदिराचे महाराज तो सन्मान स्वीकारतात. भजन- भारुड होऊन "पानसुपारी'ची सांगता होते. जळगावच्या रथोत्सवासाठी शहर व परिसरच नव्हे; तर जिल्हाभरातील खेड्यापाड्यांतूनही लोक दर्शनासाठी येतात. दिवाळीसाठी जळगावच्या माहेरवाशिणी रथोत्सवानंतरच सासरी जातात. 

सहा तासांचा उत्सव झाला बारा तासांचा 
थोर परंपरा लाभलेला रथोत्सव 1872 मध्ये सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात रथोत्सवाचे स्वरूप वेगळे होते. त्या काळात मातीच्या रस्त्यावरून रथ उत्साहाने ओढला जात होता. तसेच रात्री मशाल, पणत्या लावल्या जात होत्या. पूर्वी म्हणजे साधारण शंभर वर्षांपूर्वी जुन्या गावातच रथ फिरत असल्याने मार्गही लहान होता. यामुळे दुपारी बाराला निघालेला रथ सायंकाळी सहापर्यंत मंदिरात परत येत होता. म्हणजे सहा तासांचा हा उत्सव होता; परंतु सद्यःस्थितीत रथोत्सवातील उत्साह बदलला, रूप बदलले आणि शहराचा विस्तार वाढला, तसा मार्गही बदलला. यामुळे सहा तासांचा असलेला उत्सव बारा तासांचा झाला आहे. 

हिंदू- मुस्लिम एकोप्याचे दर्शन 
श्रीराम रथोत्सवात हिंदू- मुस्लिम समाजबांधवांचे एकोप्याचे दर्शन लाभते. कारण, श्रीराम रथ परिक्रमा करीत असताना संत लालखॉं मियॉं यांच्या समाधीजवळ येतो व थोडा वेळ थांबतो. कारण, श्री संत आप्पा महाराज व लालखॉं मियॉं यांचा स्नेहभाव खूप जवळचा होता आणि तो खानदेशात परिचितदेखील आहे. संत लालखॉं मियॉं यांच्या समाधीवर रथोत्सव समितीतर्फे पुष्पचादर अर्पण केली जात असते; तर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने रथोत्सवातील मान्यवरांचा सत्कार केला जातो. मुख्य म्हणजे श्रीराम रथावर पुष्पवर्षावदेखील केला जात असतो. 

रथाचा पूर्वीचा मार्ग 
श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हेवाडा, डॉ. आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, श्रीराम मंदिराची मागची गल्ली, राम मारुतीपेठमार्गे येऊन रथ चौकात सांगता. 

रथाचा आताचा मार्ग 
श्रीराम मंदिर, भोईटे गढी, कोल्हेवाडा, डॉ. आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, मंदिराच्या मागील गल्लीतून रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, जळगाव पीपल्स बॅंक, शिवाजी रोड, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौकमार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर, श्री मरीमाता मंदिर, भिलपुरामार्गे भिलपुरा चौक, दधिची चौक, बालाजी मंदिरामार्गे रथ चौकात रात्री बाराला रथ येतो. 

श्रीराम मंदिराचे गादिपती 
प्रथम ः श्री संत सद्‌गुरू आप्पा महाराज (1872 ते 1910) 
द्वितीय ः श्री सद्‌गुरू वासुदेव महाराज (1910 ते 1937) 
तृतीय ः श्री सद्‌गुरू केशव महाराज (1937 ते 1975) 
चतुर्थ ः श्री सद्‌गुरू बाळकृष्ण महाराज (1975 ते 2002) 
पाचवे ः विद्यमान हरिभक्त परायण श्री मंगेश महाराज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon sriram rath utsav kartik ekadashi