व्यापाऱ्यांमध्ये ‘जीएसटी’बाबत संभ्रम !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

‘जीएसटी’ लागू होताना - स्टॉक, अकाऊंट अपडेट ठेवा; सीए, कर सल्लागारांचा सल्ला 

‘जीएसटी’ लागू होताना - स्टॉक, अकाऊंट अपडेट ठेवा; सीए, कर सल्लागारांचा सल्ला 

जळगाव - एक जुलैपासून देशभरात ‘जीएसटी’ लागू होणार आहे. मात्र एप्रिलमध्ये लागू होणारी जीएसटी दोन महिने पुढे ढकलली. आता तीही लागू होणार की नाही? याबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकता आहे. अनेक व्यापाऱ्यांना ‘जीएसटी’ नेमकी कोणत्या वस्तूंवर, किती टक्के लावायची याची माहिती शासनाकडून मिळालेली नाही. बिले संगणकीय असल्याने त्याबाबतचे सॉफ्टवेअर तयार झालेले नाही. यामुळे बिले कशी द्यावी, जीएसटी कोणत्या वस्तूवर किती टक्के लावावा याची माहिती व्यापाऱ्यांना परिपूर्ण मिळालेली नाही. यामुळे व्यापारी संभ्रमात आहेत. तर व्यापाऱ्यांनी तीस जूनपर्यंतचा स्टॉक, अकाऊंट अपडेट ठेवा, रिटर्न भरून घ्या, असा सल्ला सी.ए., कर सल्लागारांनी व्यापाऱ्यांना दिला असल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली.  

रिटर्न भरून घ्या
अनिल शाह (सी.ए.)- व्यापाऱ्यांनी तीस जून पर्यंतचा स्टॉकचे अपडेट माहिती ठेवली पाहिजे.  रिटर्न भरावयाचे बाकी असतील ते भरून घ्या.  तीस जून पर्यंतचे अकाऊंट अपडेट करावीत. खरेदी बिल व्यवस्थित लावून घ्यावीत. नंतर कोणत्या बिलाच्या स्टॉकमधील माल विकला गेला याची तपासणी करताना अडचणी यायला नको, अशी काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायला हवी.

स्टॉकअपडेट ठेवा
नितीन झवर (सी.ए.) -
जीएसटी लागू होताना व्यापारी, उद्योजकांनी जुन्या मालाच्या साठ्याचा दर्जा व किमतीनुसार माहिती अपडेट ठेवावी. पुढील नव्वद दिवसात तुम्हाला रिटर्न भरावे लागणार आहेत. यामुळे स्टॉक डिटेल्स तयार ठेवावेत. स्टॉक डिटेल व झालेली विक्री याचा ताळमेळ बसायला पाहिजे. कारण या स्टॉकची तपासणी होणार आहे. तीस जून पर्यंतचा वॅट भरल्याचे माहितीही अपटेड ठेवावी. 

बिलांची माहिती दिली
सुरेश केशवानी  (टॅक्स कन्सल्टंट) -
 आमच्या ग्राहकांना आम्ही ‘जीएसटी’ लागू होतानाच्या बिलाचा नमुना पाठविलेला आहे. त्यानुसार त्यांना एक जुलैप्रमाणे त्यांना बिल करण्यास सांगितले आहे. तीस जूनपर्यंतच्या मालाची माहिती अपडेट ठेवण्यास सांगितली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी त्याबाबत प्रशिक्षण घेतलेले आहे. माझ्याकडील ९५ टक्के व्यापाऱ्यांची जीएसटी नोंदणी झालेली आहे.

‘जीएसटी’बाबत संभ्रम
पुरुषोत्तम टावरी (फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) -
 एक जुलैपासून ‘जीएसटी’ लागू होणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी नवीन मालाची खरेदी बंद केली आहे. जो माल आहे तो संपविण्याच्या मार्गावर आहेत. कारण ‘जीएसटी’त कोणत्या वस्तूवर किती टक्के जीएसटी लावायची, त्याचे बिलींग कसे करायचे, कोणत्या वस्तूवर जीएसटी नाही? याबाबत अद्याप स्पष्ट अशा सूचना व्यापाऱ्यांना नाही.

शासनाची तयारी अपूर्ण
युसूफ मकरा (व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष) -
 ‘जीएसटी’च्या जाचक अटी आहेत. मात्र शासन जीएसटी लागू करणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांची नाराजी आहे. शासनाची जीएसटी लागू करण्याची तयारी झालेली नाही. तरीही ती लागू होत आहे. व्यापाऱ्यांना कोणत्या वस्तूवर किती जीएसटी लावायची याची माहिती दिलेली नाही. यामुळे व्यापाऱ्यांचीही तयारी नाही.

Web Title: jalgav news businessman confuse by gst