‘जळगाव फर्स्ट’ देणार स्वच्छतादूत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

जळगाव - ‘जळगाव फर्स्ट’च्या स्वयंसेवकांनी रविवारी संपूर्ण शहरात स्वच्छतेचे महासर्वेक्षण केले होते. यात शहरातील निम्मा परिसर अस्वच्छ व नियमित स्वच्छता होत नसल्याने दिसून आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल आज आयुक्त जीवन सोनवणे यांना डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी सादर केला.

जळगाव - ‘जळगाव फर्स्ट’च्या स्वयंसेवकांनी रविवारी संपूर्ण शहरात स्वच्छतेचे महासर्वेक्षण केले होते. यात शहरातील निम्मा परिसर अस्वच्छ व नियमित स्वच्छता होत नसल्याने दिसून आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल आज आयुक्त जीवन सोनवणे यांना डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी सादर केला.
महापालिकेने २२ प्रभागांमध्ये दैनंदिन स्वच्छतेचे मक्ते दिले आहेत; परंतु मक्तेदार व महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील साफसफाई व्यवस्थित केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात शहरातील दोन-तीन प्रभाग सोडले, तर इतर परिसरात पुरेशी स्वच्छता दिसून आली नाही. लोकसंख्या, भौगोलिक मानाने लोखंडी कचराकुंड्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. जेथे कचराकुंड्या आहेत, त्या नियमित खाली करून स्वच्छ होत नाहीत. कागदावर जेवढी यंत्रणा, मनुष्यबळ आहे, तेवढे प्रत्यक्षात दिसत नाही. साफसफाईसाठी तेवढी वाहने, ट्रॅक्‍टर, घंटागाड्या आढळल्या नाहीत. नियमित घंटागाड्या त्या मार्गावर जात नसल्याचे डॉ. चौधरी यांनी आयुक्त सोनवणे यांना यावेळी सांगितले. यावर आयुक्तांनी महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी तसेच मक्तेदारांकडून व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याचे मान्य केले. ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून काही प्रभागांत स्वच्छतेच्या यंत्रणेवर देखरेख करण्यासाठी ‘स्वच्छतादूत’ किंवा स्वयंसेवक नेमावेत. यंत्रणा आमचीच राहील. फक्त स्वच्छतादूत नेमून अहवाल द्यावा, असा प्रस्ताव दिला. याबाबत डॉ. चौधरी यांनी शहरातील दहा वॉर्डांमध्ये स्वच्छतादूत व स्वयंसेवकांची यादी आठवडाभरात देतो, असे सांगितले. यावेळी विशाल वाघ, अनिल साळुंखे, अकीब खान, राजेंद्र महाजन, अशफाक पिंजारी, योगेश पाटील, राकेश पाटील, शोएब शेख, मतीन पटेल, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.
 

कामांवर राहणार स्वयंसेवकांचे नियंत्रण!
आयुक्त सोनवणे यांनी स्वच्छतादूत व स्वयंसेवकांमार्फत स्वच्छता नियंत्रणाच्या प्रस्तावावर डॉ. चौधरी यांनी ‘स्वच्छतादूत’ नेमण्यास हरकत नसल्याचे सांगितले. स्वच्छतादूत सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत स्वच्छतेच्या कामांवर लक्ष ठेवतील. वॉर्डांत कचरा गाडी, घंटागाडी प्रत्येक घरातून कचरा जमा करीत आहे किंवा नाही, ठरलेल्या वेळी वॉर्डांत जात आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवेल. महापालिकेचे कर्मचारी किंवा मक्तेदार असलेल्या वॉर्डात कर्मचारी कामाचा अहवाल महापालिका प्रशासनाला देतील, असे सांगितले.

Web Title: jalgav news cleaning campaign by jalgav first