अवमानकारक भाषेबद्दल खडसेंविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

अटक करण्याची दमानियांची मागणी
जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरातील सभेत आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

अटक करण्याची दमानियांची मागणी
जळगाव - राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरातील सभेत आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे आणि जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना लेखी पत्र दिले आहे. सभेत झालेल्या भाषणाचा व्हिडिओही त्यांनी पुरावा म्हणून दिला आहे. दरम्यान, खडसे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा इन्कार केला आहे. या अगोदरही दमानिया यांनी आपल्याविरुद्ध आरोप केले आहेत. मात्र, ते सिद्ध होत नसल्याने त्या आपल्यावर असे आरोप करीत असल्याचे खडसे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की खडसे यांनी एका कार्यक्रमात आपल्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे काही आपल्या शुभचिंतकांनी सांगितले. मात्र त्या वेळी आपल्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. त्या सभेचा व्हिडिओ आपल्याला मिळाला आहे. आपण तो पाहिला असता त्यांनी आपल्याविरुद्ध वापरलेली भाषा ऐकून तीव्र संताप आला. त्यांनी यापूर्वीही माझ्याविरुद्ध अवमानकारक भाषा वापरली असून, या वेळी त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना कलम 354 अंतर्गत तातडीने अटक करावी, अशी आपली मागणी आहे.

आपल्याकडे तक्रार आली आहे. तसेच खडसे यांच्या भाषणाचा व्हिडिओ आपण मागविला आहे. त्याची चौकशी करून जर त्यात आक्षेपार्ह वाटले, तर कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक

Web Title: jalgav news complaint on eknath khadse