खुल्या भूखंडांवरून गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

दोनशे जागांचा व्यावसायिक वापर होत असल्याचा महासभेत सदस्यांचा आरोप

जळगाव - दीक्षितवाडी येथील गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक संस्थेला दिलेल्या खुल्या भूखंडाचा कोणत्याही वापरासाठी विकास न केल्याने स्थानिक रहिवाशांनी या भूखंडाची मागणी केली असताना तो भूखंड पुन्हा त्याच संस्थेला देण्याच्या विषयावरून आज महासभेत चांगलाच गदारोळ झाला. शहरात महापालिकेच्या सुमारे दोनशे भूखंडांचा वापर व्यावसायिक कामासाठी होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या मुद्यावरुन सभेत गोंधळ झाला. 

दोनशे जागांचा व्यावसायिक वापर होत असल्याचा महासभेत सदस्यांचा आरोप

जळगाव - दीक्षितवाडी येथील गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक संस्थेला दिलेल्या खुल्या भूखंडाचा कोणत्याही वापरासाठी विकास न केल्याने स्थानिक रहिवाशांनी या भूखंडाची मागणी केली असताना तो भूखंड पुन्हा त्याच संस्थेला देण्याच्या विषयावरून आज महासभेत चांगलाच गदारोळ झाला. शहरात महापालिकेच्या सुमारे दोनशे भूखंडांचा वापर व्यावसायिक कामासाठी होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या मुद्यावरुन सभेत गोंधळ झाला. 

महापालिकेची विशेष महासभा सोमवारी (ता.२४) सकाळी महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर, उपमहापौर ललित कोल्हे, नगरसचिव अनिल वानखेडे होते. सभेत दीक्षितवाडी येथील खुल्या भूखंडाच्या विषयावर चर्चा होत असताना मनसेचे सदस्य अनंत जोशी यांनी महापालिकेची मालकी असलेल्या शहरातील अनेक भूखंडांवर एकतर विकास झालेला नाही, तर काही भूखंडांचा संस्था  व्यावसायिक वापर करीत आहेत, हा मुद्दा लावून धरला. असे भूखंड शोधून ते संबंधित संस्थांकडून परत घ्यावे व महापालिकेने ते विविध उपक्रमांसाठी विकसित करावे, अशी सूचना त्यांनी केली. 

दीक्षितवाडीतील भूखंडाबाबत वाद
दीक्षितवाडी येथील भूखंड ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला उद्यमी ट्रस्ट, मुंबईला रुग्णालय विकसित करण्यासाठी दिला होता. परंतु, संस्थेने त्यादृष्टीने काहीच उपयोग केला नाही. ही जागा स्थानिक रहिवाशांनी विकसित करण्यासाठी मागितली आहे. तर प्रशासनाकडून ही जागा संस्थेला देण्याबाबत का घाईने निर्णय होत आहे, असा प्रश्‍न जोशी यांनी उपस्थित केला. यावर आयुक्त श्री. निंबाळकर यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. भाजपचे गटनेते सुनील माळी यांनी या विषयाला विरोध दर्शवून जागेच्या या विषयात ‘गोलमाल’ असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनीदेखील या विषयाला विरोध दर्शवून निवेदन दिले. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात येऊन विषयपत्रिकेवरील अन्य सर्व विषय मंजूर झाले. 

... तर मतदान घ्या - रमेश जैन
दीक्षितवाडी येथील खुल्या भूखंडाबाबत जोशी यांनी केलेल्या आरोपावर सभागृह नेते रमेश जैन म्हणाले, की जागेवर अतिक्रमण होते ते महापालिकेने काढून द्यायचे होते. पण महापालिकेने ती कार्यवाही केलीच नाही. त्यामुळे ही जागा संस्थेच्या ताब्यात देता आलेली नाही. शासनाने गॅझेट काढले असून संस्थेला जागा कलम ९१ अन्वये कार्यवाही करून देण्याचे त्यात नमूद केले आहे. याबाबत जर कोणाला विरोध करायचा असेल तर मतदान घ्या असे सभागृहात सांगितले.

टीडीआरप्रकरणी काय कारवाई केली ?
कैलास सोनवणे यांनी सभेच्या सुरवातीलाच टीडीआर प्रकरणात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची तसेच सरकारी वकील केतन ढाके यांची सनद रद्द करण्याची मागणी तीन महिन्यांपूर्वी केल्याचा मुद्दा लक्षात आणून दिला. परंतु, अजूनही याबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप यावेळी सोनवणे यांनी केला. यावर आयुक्तांनी प्रकरणाची माहिती घेऊन कार्यवाही करु, असे सांगितले.

मंजूर विषय कसा काय रद्द होतो?
गिरणाटाकी परिसरातील खुल्या भूखंडाच्या जागेवर मुलींसाठी अभ्यासिका तयार करण्याचा विषय मंजूर होऊन त्याचे कार्यादेश दिल्यानंतर हा विषय कसा काय रद्द केला जातो, असा प्रश्‍न भाजप सदस्या उज्ज्वला बेंडाळे यांनी उपस्थित केला. त्यावर महापौर म्हणाले, निर्णय योग्य वाटत नसल्यास तीन महिन्यांत ठराव नियमानुसार रद्द करू शकतात, असे स्पष्ट केले.

गतिमंद मुलांसाठी भोईटे शाळेची मागणी
भाजप सदस्य रवींद्र पाटील यांनी उत्कर्ष गतिमंद शाळेतील विद्यार्थी गेल्या १० वर्षांपासून शाळेची मागणी करीत असून त्यांना ही शाळा दिली जात नाही? असा प्रश्‍न महापौरांना केला. यावेळी महापौरांनी त्या मुलांसाठी नटवर टॉकीजच्या मागील महापालिकेची शाळेचा पर्याय दिला आहे, असे सांगितले. गतिमंद शाळेतील मुले, पालक तसेच शिक्षकांनी आज सकाळी पुन्हा महापालिकेच्या इमारतीजवळ येऊन ठिय्या आंदोलन केले. तसेच लोकप्रतिनिधी, महापौर, आयुक्तांना निवेदन देऊन जोपर्यंत शाळा देत नाही, तो पर्यंत महासभेच्या दिवशी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. 

दिशाभूल करून घेतल्या सह्या 
दीक्षितवाडीच्या खुल्या भूखंडाबाबत भाजपने केलेल्या विरोधानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी विरोध दर्शविला.  या विषयासंबंधी निवेदनावर गायत्री शिंदे, दीपाली पाटील, शालिनी काळे यांच्या स्वाक्षरी देखील होत्या. नंतर हे प्रकरण काय आहे हे कळाल्यावर या विषयाला विरोध नसून आमची दिशाभूल करून स्वाक्षरी घेतली असल्याचे नगरसचिवांना सांगून संबंधित विषयास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. 

किशोर राजे निंबाळकरच महापालिका आयुक्तपदी हवेत 
महासभेच्या सुरवातीला गटनेते रमेश जैन यांनी प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर यांनी २४ दिवसांच्या काळातच शहरातील स्वच्छता, अतिक्रमणासारखे महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावण्याचा धडाका लावल्याबद्दल अभिनंदन केले. तर महापौर लढ्ढा यांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी म्हणून निंबाळकर पदावर आहेत तोपर्यंत प्रभारी आयुक्त म्हणून त्यांच्याकडेच पदभार राहू द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले. यासाठी नागरिकांसोबत सत्ताधारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असेही ते म्हणाले. प्रभारी आयुक्त म्हणून केलेल्या कामाबद्दल निंबाळकरांचा सभेत सत्कार करण्यात आला.

Web Title: jalgav news confussion on open land