अजिंठा चौकाने घेतला मोकळा श्‍वास!

अजिंठा चौकातील अतिक्रमित बांधकाम ‘जेसीबी’ने पाडण्यात आले.
अजिंठा चौकातील अतिक्रमित बांधकाम ‘जेसीबी’ने पाडण्यात आले.

पोलिस बंदोबस्तात काढले अतिक्रमण; लवकरच चौक करणार सुशोभित
जळगाव - शहरातील वर्दळीचे व वाहतुकीच्या कोंडीची समस्या बनलेल्या अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूंचे अतिक्रमण आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या यंत्रणेने भुईसपाट केले. प्रभारी आयुक्तांच्या आदेशान्वये व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दुपारी चारला महापालिकेच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तगड्या पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होऊन सायंकाळी साडेसातपर्यंत संपली.

शहरातील अस्वच्छतेचा प्रश्‍न गांभीर्याने घेऊन, त्यावर उपाययोजनांचा धडाका लावल्यानंतर किशोर राजे निंबाळकर यांनी आपला मोर्चा आता शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकांकडे तसेच अतिक्रमण केलेल्या ठिकाणांकडे वळविला आहे. त्याची सुरवात आज दुपारी चारला शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या अजिंठा चौकापासून केली. या चौकात कायम मोठ्या प्रमाणात असलेली वर्दळ, चारही बाजूंचे अतिक्रमण, बेशिस्त वाहनांमुळे या चौकाचा वाहतुकीच्या कोंडीने श्‍वास कोंडला होता. रोजच्या या समस्येमुळे वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले होते. त्यासाठी आज युद्धपातळीवर या चौकातील अतिक्रमण काढण्यात आले.

मोठ्या ताफ्यासह कारवाई
मोहिमेत तीन जेसीबी, ४० ट्रॅक्‍टर, डंपर व महापालिकेच्या विविध विभागांचे १०० मजूर सहभागी झाले होते. या कारवाईदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, श्री. निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपमहापौर ललित कोल्हे, सहाय्यक उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, आर्किटेक्‍ट शिरीष बर्वे, प्रा. डी. डी. बच्छाव, ‘न्हाई’चे प्रकल्प सहसंचालक अरविंद गंडी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पूजा करून मोहिमेला सुरवात
चौकाजवळील सातपुडा शोरूमच्या बाजूला धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढण्यापूर्वी भोळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व श्रीफळ वाढवून कारवाईला सुरवात करण्यात आली.

चौक झाला मोकळा
अजिंठा चौकात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्‍न होता. चौफुलीच्या चारही बाजूंना डावीकडे रस्त्यांवर असलेले संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. मोहिमेंतर्गत रस्त्यापासून १०० फूट लांब व ६० फूट रुंद इतके अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे चौकातील मोठा अडथळा दूर होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. अतिक्रमण काढलेल्या रस्त्यांची लगेचच दुरुस्ती करण्यात येणार असून, हे रस्ते वाहतुकीस खुले करण्यात येणार आहेत. तसेच चौकालगत वीजखांब बाजूला करण्याचे आदेश आयुक्तांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिले.

चौकाचे लवकरच सुशोभीकरण
हा चौक शहराचे प्रवेशद्वार असून, तेथील वाहतूक कोंडी कमी करून चौकाचे विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने सुशोभीकरण करण्याचा मानस निंबाळकरांनी व्यक्त केला. त्यासाठी संस्थांना आवाहन करण्यात येईल. चौकात वाहतूक नियमनासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात असतील, अशा सूचनाही त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिल्या.

नियम मोडल्यास होणार दंड
शहरातून गेलेल्या महामार्गावरच चालक रस्त्याच्या कडेलाच ट्रक उभे करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा तसेच इतरांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे रस्त्याच्या कडेला ट्रक लावणाऱ्या चालकांना उद्यापासून बंदी घालण्यात आली असून, ट्रक तेथे लावल्यास दंड वसूल करण्याचे आदेश श्री. कराळे यांनी वाहतूक शाखेला दिले.

जीर्णोद्धार करून देण्याचे आश्‍वासन
चौकाच्या एका बाजूला असलेल्या धार्मिक स्थळाचे अतिक्रमणही यावेळी काढण्यात आले. मात्र, ते काढण्यापूर्वी काही जणांकडून यास विरोध करण्यात आला; परंतु आमदार व महापौरांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर अतिक्रमण काढण्यात आले.

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा
महामार्गावर अतिक्रमणाविरोधात कारवाई करीत असताना बघणाऱ्यांनी गर्दी केली होती. तसेच महामार्गावरील चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची वर्दळही या वेळेत वाढली होती. त्यामुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गर्दीमुळे चारही बाजूंकडील वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, चार-पाच वाहतूक पोलिस या वाहतुकीच्या नियमनासाठी सज्ज होते. त्यामुळे जास्त काळ वाहतूक ठप्प झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com