सुरक्षारक्षकाशी संगनमत; तिघांचा डाळीवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

दालमिलमधून ४८ हजारांचा माल लंपास; त्रिकूट पोलिसांच्या तावडीत

जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरातील दालमिलमधून शनिवारी (२२ जुलै) मध्यरात्री ४८ हजारांच्या डाळीची चोरी झाली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दालमिलच्या सुरक्षारक्षकासह तिघांना ताब्यात घेतले. 

दालमिलमधून ४८ हजारांचा माल लंपास; त्रिकूट पोलिसांच्या तावडीत

जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरातील दालमिलमधून शनिवारी (२२ जुलै) मध्यरात्री ४८ हजारांच्या डाळीची चोरी झाली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दालमिलच्या सुरक्षारक्षकासह तिघांना ताब्यात घेतले. 

औद्योगिक वसाहत परिसरात अनेक डाळप्रक्रिया उद्योग आहेत, इतरही छोटे-मोठे कारखाने असून साप्ताहिक सुटीचा वार (शनिवार) निवडून होणाऱ्या चोऱ्यांनी व्यापारी उद्योजक हैराण झाले आहेत. काहींनी तर कंपनीत रात्रीची एक फेरी ठेवून सुरक्षारक्षकांवरही पाळत ठेवली आहे. मात्र, होणाऱ्या चोऱ्यांवर नियंत्रण येत नसल्याने मालक हवालदिल झाले होते. औद्योगिक वसाहत पोलिसांत किरकोळ पोते-दोन पोती डाळचोरीच्या नियमित येणाऱ्या तक्रारी नेहमीच्याच आहेत. शनिवारी (२२ जुलै) रात्री राज ॲग्रो इंडस्ट्रीज (ई-सेक्‍टर, ७२) या दालमिलच्या तारेचे कुंपण तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मिलच्या कंपाऊंडमधील शेडमध्ये रचलेल्या डाळीच्या पोत्यांपैकी २७ पोती उडीदडाळ चोरट्यांनी लंपास केल्याचे कळाल्यावर मिलमालक प्रेमचंद राजमल चोरडिया यांनी पोलिसांना कळविले. सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, राहुलकुमार पाटील डीबी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धडकले. पाहणी केल्यावर पहाटेच चोरट्यांच्या शोधार्थ दोघे कर्मचारी रवाना झाले होते. निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी शरद भालेराव, गोविंदा पाटील दोघेही चोरट्यांचा शोध घेत असताना नेमका आजच त्यांच्या हाती मुख्य चोरटा, सुरक्षारक्षक आणि चोरीची डाळ विक्री करणारा भामटा असे त्रिकूट चार पोती डाळीसह तावडीत सापडले. 

शनिवार, रविवार चोरांचा
औद्योगिक वसाहतीत बहुतांश सर्वच कारखाने शनिवारी बंद असतात. रविवारी सायंकाळपासून शिप सुरू होते याचा चोरट्यांना बऱ्यापैकी फायदा होऊन चोऱ्यांचे प्रकार वाढले होते. अटक करण्यात आलेल्या डाळचोरट्यांमध्ये गोकुळ हंसराज राठोड (वय ४३, रा. सुप्रिम कॉलनी) मुख्य संशयित कंपनीतील सुरक्षारक्षक राजाराम सुकदेव पाटील (वय ६५, रा. राज इंडस्ट्रीज) यांच्या संगनमताने डाळीच्या पोतींपैकी ठराविक चार-पाच पोती डाळ एकावेळी लांबवून ती सुप्रिम कॉलनीत शरीफ गफ्फार पटेल (वय ३७) याच्या घरी ठेवून नंतर परिसरात निम्म्या दराने विक्री करण्यात येत होती. शनिवारी रात्री झालेल्या चोरीतील मालाची विक्री होऊन रविवारी पैसे मिळून जात असल्याने चोरट्यांचे बऱ्यापैकी सुरू होते.

पोलिस चोरट्याच्या घरात 
चोरीची डाळ विक्रीची माहिती आल्यावरून शरद भालेराव, गोविंदा पाटील पहाटेच शरीफ पटेलच्या घरी धडकले. घरात चार पोती डाळ मिळून आली, चौकशी करताच त्याने गोकूळ राठोडचे नाव सांगितले. थोड्या वेळातच गोकूळ पटेलच्या घरी पैसे घेण्यासाठी येत असल्याने दोघेही पोलिस घरात लपले गोकुळ राठोड येताच दोघांनी त्याच्यावर झडप घालत पकडले. पोलिसी प्रसाद दिल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली, सहाय्यक निरीक्षक राहुल कुमार पाटील यांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर वॉचमनच्या मदतीने चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यावरून राज ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक प्रेमचंद चोरडिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या महिन्यात लाखाची चोरी

दालमिलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा गैरफायदा घेत सुरक्षारक्षक आणि चोरट्यांनी संगनमत करून मागील महिन्यातही एक लाख रुपये किमतीची (५२ कट्टे) उडीदडाळ लंपास केली होती. आज पुन्हा या त्रिकुटाने मिळून ४८ हजार रुपये किमतीची २७ कट्टे डाळ चोरून नेल्याप्रकरणी तिघांना अटक केली.

Web Title: jalgav news crime in jalgav