टपाल कार्यालयात ग्राहक तासन्‌तास ताटकळत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नागरिकांचे हाल; सर्व्हर डाऊन; कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे समस्या

जळगाव - भारतीय टपाल विभागाकडून ग्राहकांना सेवा देण्यासाठी काम संगणकीय करण्यात आले आहे. तरीदेखील येथे संथगतीने कामकाज होत असल्याने येणाऱ्या ग्राहकाला काम पूर्ण करून घेण्यासाठी किमान एक तास तरी रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव पाहण्यास मिळाले. दरम्यान, आज औरंगाबाद येथील मुख्य टपाल अधीक्षक आले असल्याने रोजपेक्षा सुरळीत काम सुरू असल्याचे चित्र होते.

नागरिकांचे हाल; सर्व्हर डाऊन; कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे समस्या

जळगाव - भारतीय टपाल विभागाकडून ग्राहकांना सेवा देण्यासाठी काम संगणकीय करण्यात आले आहे. तरीदेखील येथे संथगतीने कामकाज होत असल्याने येणाऱ्या ग्राहकाला काम पूर्ण करून घेण्यासाठी किमान एक तास तरी रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव पाहण्यास मिळाले. दरम्यान, आज औरंगाबाद येथील मुख्य टपाल अधीक्षक आले असल्याने रोजपेक्षा सुरळीत काम सुरू असल्याचे चित्र होते.

टपाल विभागातील काही जुन्या योजना आजही चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. यात प्रामुख्याने आर्वती ठेव (आर.डी.), सेव्हिंग बॅंक मुदतठेव, किसान विकास पत्र या योजना सुरू आहेत. पोस्ट खात्यात आजही आर.डी., मुदतठेव योजनांचे लाभ घेणारे अनेक जुने ग्राहक आहेत. ते कायम पोस्ट कार्यालयात येत असतात. आजही कार्यालय उघडल्यापासून कोणी ठेवी काढण्यासाठी, तर कोणी मनीऑर्डर, रजिस्टर करण्यासाठी आलेले होते. पण, आपले काम करून बाहेर निघण्यास त्यांना दुपारचे बारा- साडेबारा वाजले असल्याचे येथे पाहण्यास मिळाले. पोस्ट कार्यालयात काम धिम्या गतीने होत असल्याच्या ग्राहकांकडून येत असलेल्या तक्रारी आज येथे प्रत्यक्षात पाहण्यास मिळाल्या.

तीन काऊंटरवर कायम गर्दी
टपालच्या मुख्य कार्यालयात वेगवेगळ्या योजना व सेवांची माहिती आणि लाभ देण्यासाठी सात काउंटर आहेत. यात पहिला टेबल आर.डी. योजना, दुसरे आणि तिसऱ्या टेबलवर सेव्हिंग बॅंक म्हणजे पीपीएफ व मुदतठेवीचे काम चालते. चार क्रमांकावर बचतपत्र- किसान विकास पत्र, पाच क्रमांकावर मनीऑर्डर, पीएलआय, टेलिफोन बिल स्वीकृती होते. सहा क्रमांकावर तिकीट विक्री आणि सातव्या टेबलावर रजिस्टर, स्पीडपोस्ट, पार्सल पाठविण्यासाठीचे कामकाज केले जाते. यामधील टेबल क्रमांक दोन, तीन आणि सात क्रमांकावर कायम गर्दी असल्याचे पाहण्यास मिळाले. अगदी सकाळी दहा वाजेपासून कामकाजाला सुरवात तेव्हापासून गर्दी होती. यामधील दोन आणि तीन क्रमांकावरील टेबलावरील कामकाज अगदी धिम्या गतीने सुरू असल्याने सकाळी साडेअकराला आलेला ग्राहक जेवणाच्या वेळेपर्यंत रांगेत उभा असल्याचे पाहण्यास मिळाले.

सिस्टिम बंदने काम थांबले
संगणकावर कामकाज सुरू असल्याने याला इंटरनेटशी देखील जोडण्यात आलेले आहे. अनेकदा सर्व्हर डाऊन होत असल्याने काम थांबत असते. आज देखील असाच प्रकार पाहण्यास मिळाला. सर्व्हर डाऊन नाही, पण टेबल एक आणि दोनवरील संगणकातील सिस्टिम दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी बंद झाल्याने काम थांबले होते. यातील एक नंबरच्या टेबलावरील काम लागलीच सुरू झाले. मात्र, दोन नंबरच्या टेबलावरील सिस्टिम सुरू होण्याची प्रतीक्षा संबंधित महिला कर्मचाऱ्याने केली; परंतु लंच ब्रेक होईपर्यंत सुरू न झाल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

एजंटांचा कायम वावर
टपाल कार्यालयात देखील एजंटांचा वावर पाहण्यास मिळतो. आज देखील कार्यालयात एक महिला आणि दोन पुरुष असे तीन एजंट फिरत होते. येथे येणाऱ्या ग्राहकाला हेरून लवकर काम करून देण्याचे सांगत विशिष्ट रक्‍कम घेतली जाते. आज दुपारी पवणे दोनच्या सुमारास मेहरूण परिसरातील एक परिवार आर.डी.च्या कामासाठी आले होते. येथील पूर्ण माहिती नसल्याने एजंटामार्फत काम करण्याचे निश्‍चित केले. मात्र, ज्या एजंटने काम करण्याचे कबूल केले, तो शोधूनही न सापडल्याने त्या व्यक्‍तीने दुसऱ्याला केवळ माहिती विचारली. ही बाब पाहिल्याने संबंधित एजंटने कागदपत्र फेकून देत, ज्याला विचारले त्याच्याकडूनच काम करण्याचे सांगितले. हे प्रकार नित्याचेच अनुभवण्यास मिळत असून, यावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे.

मुख्य अधीक्षक आल्याने वातावरणात तणाव 
टपालच्या मुख्य कार्यालयात औरंगाबाद विभागाचे मुख्य अधीक्षक प्रणव कुमार आले असल्याने कार्यालयातील वातावरण थोडे टाईट असल्याचे पाहण्यास मिळाले. सर्व कामकाज सुरळीत आणि लंच ब्रेक आटोपल्याबरोबर दीडला सर्व कर्मचारी खुर्चीवर हजर झाल्याचे पाहण्यास मिळाले.

Web Title: jalgav news Customer standing at the post office