आईच्या उपचारासाठी डाळचोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

अट्टल चोरट्याचा जबाब; त्रिकुटाने काढून दिले डाळीचे सोळा कट्टे

जळगाव - आईला कर्करोग झाल्याने उपचारावरील खर्चासाठी चोरी करीत असल्याचे डाळचोरी प्रकरणातील संशयिताने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. दरम्यान, या प्रकरणात अटकेतील तिघांनी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत गुन्ह्यांची कबुली देत अगोदर चार आणि आज १३ पोती डाळ काढून दिली आहे. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून, उद्या (२६ जुलै) तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

औद्योगिक वसाहतीच्या ई-सेक्‍टरमध्ये प्रेमचंद राजमल चोरडिया यांच्या मालकीच्या ‘राज इंडस्ट्रीज’ या दालमिलमधून चोरट्यांनी शनिवारी (२२ जुलै) रात्री २७ डाळींचे कट्टे लंपास केल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी संशयित सुरक्षारक्षक राजाराम पाटील याच्यासह गोकूळ राठोड, शरीफ पटेल या तिघांना अटक करण्यात आली. पटेल याच्या घरात लपलेला मुख्य संशयित चोरटा गोकूळ राठोड याला ताब्यात घेत चार पोती (कट्टे) डाळीसह ताब्यात घेण्यात आले होते. दोन दिवस पोलिस कोठडी मिळाल्यावर आज संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार विक्री केले तर अतिरिक्त १३ पोते डाळ जप्त केली आहे. बुधवारी संशयिताची पोलिस कोठडी पूर्ण होत असून त्यांची पुन्हा कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. 

चोरीपूर्वीच ग्राहक तयार 
संशयित राठोड हा शनिवार-रविवार बघून चोरीसाठी डाळ मिल निवडत होता. चोरी करण्यापूर्वी सुप्रिम कॉलनी, पोलिस कॉलनी परिसरात तो महिला ग्राहकांचा शोध घेऊन ठेवत होता. निम्मे किमतीत डाळ मिळत असल्याने महिला त्याच्या आमिषाला बळी पडत. एक पोतं सांगितल्यावर मात्र तो दोन पोते टाकून मिळेल ती रक्कम घेऊन जात असे. उर्वरित नंतर हिशेब करून टप्प्याटप्प्याने मागत होता. 

आईला कॅन्सर 
चौकशीनंतर राठोडने तेरा कट्टे काढून दिले. आईला कॅन्सर झाल्याचे वारंवार सांगत होता. चोऱ्या करून आईच्या उपचाराला लागणारा खर्च भागवत असल्याचे त्याने सांगितल्यावर त्याचीही खात्री पोलिसांनी करून घेतली. जिल्हा रुग्णालयात त्याची आई दाखल असून औषधोपचार सुरू आहेत, राठोड हा अट्टल चोरटा असून अनेक वर्षांपासून तो चोरीच्या धंद्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: jalgav news dal theft for mother treatment