चर्चेतूनच कर्जमाफी ऑक्‍टोबरपूर्वी शक्‍य - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

जळगाव - 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी माझीही भूमिका आहे. मात्र त्यासाठी केवळ आंदोलनच नव्हे तर चर्चाही आवश्‍यक आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत तयारी दाखविली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्चू कडू यांनी चर्चा करावी. चर्चेतूनच कर्जमाफी 31 ऑक्‍टोबरच्या दोन महिने अगोदरही होऊ शकते,'' असे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

जळगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आठवले आले होते. विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यांना कर्जमाफी निश्‍चित मिळाली पाहिजे. मात्र हा प्रश्‍न चर्चेने सोडविला पाहिजे. आमदार बच्चू कडू चांगले नेते आहेत. त्यांनी बॉम्ब फेकण्यासारखी अतिरेकी भाषा करू नये, संयमाने बोलावे.''

'नोकरीत राखीव असलेल्या जागांमधूनच आता बढती देण्यात येणार असून, आरक्षित जागांमधूनच बढती देण्याचा कायदा लवकरच मंजूर करण्यात येईल,'' असेही आठवले यांनी स्पष्ट केले. लोकसभेत लवकरच हा मसुदा मांडून तो कायदा समंत होईल. "ओबीसीं'साठी असलेल्या आयोगाला लवकरच घटनात्मक दर्जा देण्यात येईल. त्यामुळे ओबीसींमधील सर्व घटकांना न्याय देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: jalgav news Debt free loan can be made before October