‘कर्जमाफी’त शेतकऱ्यांची कोंडी सुरूच

‘कर्जमाफी’त शेतकऱ्यांची कोंडी सुरूच

जळगाव - राज्य शासनाने गाजावाजा करीत सोमवार (ता. २४)पासून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र, या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची दिवसागणिक नवनवीन प्रकारे कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन अर्जामध्ये शेतकऱ्याकडील बॅंकेचे मूळ कर्ज किती, त्यावरील व्याज किती अशी आकडेवारी हवी असताना ती गावात सोसायट्यांच्या सचिवांकडून मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वीच शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

योजनेत पहिल्याच दिवशी सर्व्हर ‘हॅंग’ झाल्याचे कारण दाखवीत किती शेतकऱ्यांचे अर्ज भरले गेले याची माहिती मिळाली नसून, दुसऱ्या दिवशीही ऑनलाइन अर्ज भरल्याचा तपशील राज्य शासनाकडे आहे, असे सांगत स्थानिक सहकार विभाग, जिल्हा बॅंकेचे अधिकारीही कर्जमाफीच्या भरलेल्या अर्जांची माहिती देऊ शकले नाहीत. यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्याचा केवळ फार्स तर नाही ना, अशा संतप्त प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अर्जांसाठी शुल्क 
दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना प्रशासनाने जाहीर केलेल्या केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज उपलब्ध झाले नाहीत. काही शेतकऱ्यांनी सायबर कॅफेवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरले. मात्र, त्यांना त्याची शुल्क द्यावी लागले आहे.

जिल्ह्यात एक हजार ७४४ केंद्रे असल्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले होते. दोन लाख अर्ज छापून ते प्रत्येक तालुक्‍याला एक हजार याप्रमाणे वितरित केले जातील. रोज कोणत्या तालुक्‍यात किती ‘विकासो’मधून अर्ज भरले याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध होईल.

त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ‘कर्जमाफी कक्ष’ सुरू केला जाईल, असेही सांगण्यात आले होते. आज प्रत्यक्षात तालुक्‍यातील ‘विकासो’, तालुका उपनिबंधक कार्यालयात अर्जच पोहोचले नसून, किती ठिकाणी केंद्र सुरू आहेत? त्यावर कर्मचारी किती नेमले आहेत, याबाबतही माहिती सहकार विभागाकडे उपलब्ध नाही. 

शेतकऱ्यांची भटकंती अटळ
कर्जमाफीच्या अर्जात शेतकऱ्यांकडे कोणते कर्ज आहे? किती कर्ज आहे? व्याजाची रक्कम किती? किती मुदतीचे कर्ज आहे? पूर्वी कधी कर्ज घेतले होते? एकूण थकबाकी किती? अशी माहिती अर्जात भरायची आहे. किती कर्ज उचलले होते, ते शेतकरी सांगू शकतील. पण, एकूण व्याजासह थकबाकीची रक्कम संबंधित ‘विकासो’च देऊ शकेल. यामुळे अर्ज उपलब्ध झाले तरी माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंतीच करावी लागणार आहे.

शेतकरी म्हणतात...

ऑनलाइन अर्ज भरण्याचा फार्स
एन. डी. पाटील - धरणगाव तालुक्‍यात ‘विकासो’कडे कर्जमाफीचे अर्ज दुपारपर्यंत नव्हते. दुपारी तालुका निबंधकांनी सर्व ‘विकासो’च्या सचिवांची बैठक घेतली, त्यावेळी अर्ज दिले. मात्र, अर्ज कसे भरावेत याची माहिती मिळाली नाही. आज एकही अर्ज भरला गेला नाही. पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्याचा फार्स शासन करीत आहे. जी माहिती अर्जात भरावयाची आहे, तिचा तपशील फक्त ‘विकासो’कडे असेल. ती माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

अर्जच उपलब्ध नाही
सुधाकर पाटील (हनुमंतखेडा, ता. एरंडोल) - कर्जमाफीचे अर्ज आमच्या तालुक्‍यात उपलब्ध झालेले नाहीत. अर्जात अनेक प्रकारची माहिती भरायची आहे. गटसचिव संपावर आहेत. यामुळे किती कर्ज होते? मुद्दल किती? व्याज किती? एकूण थकबाकी किती? याची माहिती शेतकऱ्यांना कोण देईल? अतिशय क्‍लिष्ट माहिती कर्जमाफीच्या अर्जात आहेत.

केवळ पंधरा हजार अर्ज
दोन लाख अर्ज छापल्याचे काल सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पंधरा हजार अर्ज छापले असून, तेही ग्रामीण भागात पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांनी अर्ज कसे भरावेत, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ‘आपले सरकार पोर्टल’, ‘सीएससी’ सेंटर, महा ऑनलाइन’ या साइटवर प्रतिनिधींची नियुक्ती केल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या प्रतिनिधींनाही अर्ज कसा भरावा, याची माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे एकंदरीत ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज उपलब्ध करून देण्यात, अर्ज भरण्यात गोंधळ असल्याचे शेतकरी सांगतात.

कर्जमाफीचे एकूण अर्ज किती भरले, याची माहिती उपलब्ध नाही. ऑनलाइन सिस्टिम असल्याने सर्व माहिती थेट शासनाकडे जाते. आम्ही तालुका उपनिबंधकांकडे अर्ज पाठविले आहेत. त्यांना गटसचिवांच्या बैठका घेऊन कर्जमाफी अर्ज भरण्याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.
- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com