मुंबई महापालिकेच्या ठेवी कर्जमाफीसाठी द्याव्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

अजित पवार यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

अजित पवार यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
जळगाव - सरकारमध्ये राहून कर्जमाफीसाठी सरकारविरोधात ढोल बडविण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल, तर आपली सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे मुदत ठेवीत ठेवलेले साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला द्यावेत आणि त्या बदल्यात राष्ट्रीयीकृत बॅंकेप्रमाणे व्याज घ्यावे, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जळगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिले.

जळगाव येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा झाला. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर बॅंकांसमोर ढोल वाजविण्याचे नाटक करत आहेत. सरकारमध्ये तेसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनाही माहीत आहे, की सरकारकडे पैसेच नाहीत तर देणार कुठून? सर्व सोंगे करता येतात; मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे पैसे उभे करण्याचा सरकारपुढे प्रश्‍न आहे. राज्यात कर्जमाफीसाठी 35 हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने तब्बल 60 हजार कोटींच्या मुदत ठेवी बॅंकेत ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी निर्णय घेऊन ही रक्कम बॅंकेत ठेवण्यापेक्षा सरकारला द्यावी. त्यातून शेतकऱ्यांची कर्जफेड करावी व त्या बदल्यात राष्ट्रीयीकृत बॅंकेचे जे व्याज असेल, ते सरकारकडून घ्यावे. याबाबत सत्तेतील मित्रपक्ष भाजपशी बोलणी करून घ्यावी. यामुळे मुंबई महापालिकेच्या विकासाला व्याजातून पैसाही मिळेल आणि शेतकऱ्यांची कर्जफेडही होईल. त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

...तर कॅबिनेट बंद पाडा
शिवसेनेवर टीका करताना अजित पवार म्हणाले, की कर्जमाफीसाठी शिवसेना राज्यभर ढोल बडवत फिरते आहे. "आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी', असा उद्धव ठाकरे यांचा प्रकार आहे. त्यांच्या "मातोश्री' निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्‍न करावा. मंत्रिमंडळात त्यांचे बारा मंत्री आहेत, कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी प्रथम कर्जमाफीचा प्रश्‍न विचारावा. हा प्रश्‍न निकाली निघाल्याशिवाय कॅबिनेट चालूच देऊ नये; मात्र शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये चहा पितात आणि बाहेर येऊन कर्जमाफी झाली नाही, म्हणून ओरडत असतात.

Web Title: jalgav news Deposits of Mumbai Municipal Corporation should be given for debt relief