प्रत्येक टप्प्यावर होते पाणी दूषित!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

‘अमृत’ देणारी योजनाही रखडल्याने स्थिती बिकट

‘अमृत’ देणारी योजनाही रखडल्याने स्थिती बिकट

जळगाव - शहरातील पाणीपुरवठ्याचा स्त्रोत वाघूर धरण असले, तरी धरणातून जलशुद्धीकरण प्रकल्प, तेथून १५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरातील मुख्य जलकुंभापर्यंत व नंतर अंतर्गत जलवाहिन्यांमधून विविध भागांना पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे यंत्रणेतील दोषांमुळे पाणी दूषित होते. ते जळगावकरांच्या पोटात जाते. ही संपूर्ण यंत्रणा सक्षम व सुरक्षित केल्याशिवाय जळगावकरांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही आणि त्यासाठीच ही यंत्रणा सज्ज करणाऱ्या ‘अमृत’ योजनेशिवाय पर्याय नाही.
शहरासाठी वाघूर धरणातील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून उमाळे (ता. जळगाव) येथील जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर सुमारे २० ते २५ किलोमीटरवर १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील जलकुंभांत हे पाणी आणून ते नियोजित वेळापत्रकानुसार शहरातील विविध भागांतील रहिवाशांना अंतर्गत जलवाहिनीतून पुरवठा केला जातो; परंतु पाण्याच्या या प्रवासात विविध टप्प्यांमध्येच अनेक त्रुटी असल्याने हे पाणी शुद्ध करूनही जळगावकरांना पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

मुख्य जलवाहिनीच्या दर्जावरच आक्षेप
जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी वाहून आणणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दर्जावर सुरवातीपासूनच आक्षेप आहेत. या सदोष जलवाहिनीत आतून शेवाळ, अन्य दूषित घटक पाण्यात मिसळतात. त्यामुळे शुद्ध पाणी पुन्हा दूषित होते, असा काहींचा दावा आहे. तसेच ही जलवाहिनी २०-२५ किलोमीटरवरून येत असल्याने ठिकठिकाणी तिला गळती लागली असून, व्हॉल्व्ह गळती होऊन जलवाहिनीलगतच्या गटार, नाल्यातील पाणीही त्यात मिसळते व ते अधिक दूषित होते, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत.

जलकुंभही अस्वच्छ
जलवाहिनीतून पाणी गिरणा टाकी आवारातील जलकुंभांमध्ये जमा होते, तर अन्य जलकुंभांमध्येही पाणी जाते. गिरणा टाकीसह अन्य जलकुंभ गेल्या पाच-सहा वर्षांपासून स्वच्छ केलेले नाहीत. बुधवारी (२८ जून) उपमहापौरांनी केलेल्या पाहणीत या जलकुंभांची अवस्था समोर आली. जलकुंभांत गाळ, शेवाळ असल्याने तिथून पुन्हा पाणी दूषित होते.

अंतर्गत जलवाहिन्याही सदोष
जलकुंभांमधून पाणी शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांमधून विविध भागांपर्यंत पोहोचते. त्या भागांतील उपवाहिन्यांमधून ते नागरिकांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहोचविले जाते. शहरातील महापालिकेच्या अंतर्गत जलवाहिन्या वेगवेगळ्या भागांतून जातात. त्या काही ठिकाणी फुटलेल्या, तर त्यावरील व्हॉल्व्हचीही अनेक ठिकाणी गळती दिसून येते. त्यातही आजूबाजूचे दूषित घटक, गटार- नाल्यातील पाणी जाऊन एकूणच पुरवठा दूषित होतो.

जलशुद्धीकरण केंद्रावर प्रश्‍नचिन्ह
उमाळे (ता. जळगाव) येथील जलशुद्धीकरण केंद्रावर व्यवस्थित जलशुद्धीकरण केले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. तसेच पाण्याला पिवळसर रंग येतो, याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तज्ज्ञांची मदत घेण्याबाबत सल्ला दिला आहे. महापालिकेने घेतलेले नमुने प्रयोगशाळेने ‘पिण्यास योग्य’ ठरविले आहेत. 

खोदकामाने वाहिन्यांना गळती
शहरात मोबाईल कंपन्यांतर्फे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत रस्त्यांच्या बाजूने किंवा रस्त्यातून खोदकाम सुरू आहे; पण हे खोदकाम सुरू असताना जलवाहिन्यांना कुठे गळती लागत आहे का, याबाबत मात्र महापालिकेने लक्ष दिलेले नाही. 

अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही परिणाम
दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतरही पाण्याच्या दर्जावर परिणाम होतो, असे महापालिका वर्तुळातच बोलले जाते. काही अधिकारी या यंत्रणेतील अनुभवी, जाणकार आहेत. त्यांना सर्व ठिकाणच्या गळत्यांबाबत पूर्ण माहिती असते. मात्र, त्यांची बदली झाली, की पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो, असे मानले जाते. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

शुद्ध पाण्यासाठी ‘अमृत’ची गरज!
शहराला शासनाकडून अमृत योजनेंतर्गत अडीचशे कोटींच्या जलवाहिनीचा प्रकल्प मंजूर झाला आहे; पण या योजनेत मंजूर निविदाधारक मक्तेदाराबाबत उठलेल्या प्रश्‍नामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

यामागेदेखील राजकीय शक्ती असल्याचे बोलले जाते. एकीकडे सदोष पुरवठा यंत्रणेमुळे नागरिकांना दूषित पाणी दिले जात असताना, अमृत योजना खऱ्याअर्थाने शुद्ध पाणी देणारे ‘अमृत’ ठरणार आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेने योजना रखडली आहे.

जलकुंभ स्वच्छतेसाठी बैठक
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेतली. तीत सर्व जलकुंभांबाबत त्या प्रभागातील अभियंत्यांनी पाहणी करून काय दुरुस्ती, सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासह स्वच्छतेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उद्यापर्यंत (३० जून) अहवाल देण्याचे सांगितले आहे. तसेच बंद असलेला सुकदेवराव यादव जलकुंभ सुरू करण्याबाबत निवृत्त अभियंत्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

Web Title: jalgav news Every time the water was uncleaned