कायदे, नियमांची जाणीव प्रत्येकालाच हवी - दत्तात्रय कराळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

जळगाव - समाजात वावरताना पुस्तकीज्ञानाबरोबरच कायदे, नियमांचीही जाणीव असणे महत्त्वाचे आहे. विशेष करून महिला व मुलींनी पुढाकार घेऊन ही माहिती समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज व्यक्त केले.

जळगाव - समाजात वावरताना पुस्तकीज्ञानाबरोबरच कायदे, नियमांचीही जाणीव असणे महत्त्वाचे आहे. विशेष करून महिला व मुलींनी पुढाकार घेऊन ही माहिती समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा पोलिस दलातर्फे मंगलम्‌ हॉलमध्ये सकाळी अकराला घेण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व निर्भया पथकातील सदस्यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील अनुभवकथन सत्र कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या गणेशोत्सवात ‘यिन’ व जिल्हा पोलिस दलातर्फे वाहतुकीचे नियम, पर्यावरण जनजागृती व विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, प्रोबेशनर पोलिस अधीक्षक धनजंय पाटील, उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. 

अनुभवकथन सत्राच्या सुरवातीला गणेशोत्सवादरम्यान ‘यिन’ व निर्भया पथकातील सदस्यांनी आपापले अनुभवकथन, सूचना तसेच विविध प्रसंगांची माहिती दिली. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रवीण वाडिले, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रोहोम, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पीयूष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

सहभागातून वाढतो आत्मविश्‍वास - बुवा
सध्या जशास तसे वागण्याचा काळ आहे. त्यामुळे नमस्कार करणाऱ्याला नमस्कार, तर चमत्कार दाखविणाऱ्याला चमत्कार दाखविण्याची गरज आहे. त्यामुळे मुलींनी समाजात वावरताना खंबीरपणे उभे राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी निर्भयासारख्या उपक्रमातून मुलींचे धैर्य व आत्मविश्‍वास वाढत आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सवात ‘यिनर्स’ने सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे येणाऱ्या उपक्रमांतही सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. बुवा यांनी केले. 

महिलांच्या पुढाकाराला पाठिंबा - सांगळे
गणेशोत्सवात ‘सकाळ’च्या ‘यिन’ व निर्भया पथकातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्य केले. त्याचप्रमाणे भविष्यातही विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदवत सुजाण व दक्ष नागरिक होण्याकडे पाऊल टाकावे. पुरुषांप्रमाणेच गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात महिलांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र मंडळ स्थापन करावे. यासाठी पोलिस दलातर्फे विशेष पाठिंबा दिला जाईल, असे आश्‍वासन उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन सांगळे यांनी दिले.

‘सायबर क्राइम’वर मार्गदर्शन
‘यिनर्स’ व निर्भया पथकातील सदस्यांच्या अनुभवकथन सत्रानंतर  सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी ‘सायबर क्राइम’संदर्भात माहिती दिली.  

उपक्रमातील सदस्यांनी केले अनुभवकथन
‘यिनर्स’ व निर्भया पथकातील मुली व मुलांनी गणेशोत्सवकाळात पोलिसांसमवेत राहून पाळलेल्या वाहतूक नियमांचे तसेच आलेले 
अनुभव कथन केले. यात रात्रीच्या वेळी बाहेर राहण्याचा आत्मविश्‍वास, कशा पद्धतीने गर्दीची परिस्थिती सांभाळावी, विकृत माणसांचा प्रतिकार करताना त्यांना कसे उत्तर द्यावे, पोलिसांच्या कामकाजाचा आलेला अनुभव, नियम व कायदा न पाळणाऱ्या व्यक्ती यावेळी दिसून आल्याचा अनुभव. तसेच निर्माल्य संकलनातून पर्यावरण संवर्धनामुळे मिळालेले समाधान आदी बाबी विद्यार्थ्यांनी यावेळी कथन केल्या. यावेळी मुला-मुलींनी अनेक सूचना उपस्थित करीत काही शंकाही पोलिस अधीक्षकांना विचारल्या. 

Web Title: jalgav news Everyone needs the laws, rules and regulations