वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

जळगाव - नीलगाईंसह वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे जळगाव, भुसावळ व जामनेर तालुक्‍यातील शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

जळगाव - नीलगाईंसह वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे जळगाव, भुसावळ व जामनेर तालुक्‍यातील शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

जळगाव तालुक्‍यातील नशिराबाद, बेळी, निमगाव, भागपूर, कंडारी, उमाळे, कुसुंबा, जामनेर तालुक्‍यातील नेरी, गाडेगावसह इतर गावांना तसेच भुसावळ तालुक्‍यातील सुनसगाव, बेलव्हाळ, वराडसिम, गोजोरे, गोंभी, कुऱ्हा (पानाचे), मांडवेदिगर, शिंदी, सुरवाडे, खंडाळा, मोंढाळासारख्या बऱ्याच गावातील शेतीशिवारात नीलगाईंच्या मुक्त संचारामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. भागपूर शिवारातील वनाला संपूर्ण कुंपण करून सर्व नीलगाईंना (लोधळ्यांना) भागपूर वनक्षेत्रात स्थलांतरित करावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या पंधरा दिवसांत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चात शंभर ते दीडशे शेतकरी सहभागी झाले होते. यात वाल्मीक पाटील यांच्यासह जळगाव, जामनेर, भुसावळ तालुक्‍यातील अनेक गावांतील त्रस्त शेतकरी उपस्थित होते.

शेतीत वावर नेहमीचाच
जळगाव, जामनेर, भुसावळ तालुक्‍यातील अनेक गावे वनक्षेत्राला लागून आहेत. त्या गावात नीलगाईंचा मुक्त संचार असल्याने शेतीपिकांमध्ये वावर नेहमीचा झाला आहे. शेतात दिवसभर राबल्यानंतर नीलगाईंना आवर घालण्यासाठी रात्री शेतकऱ्यांना राखणही करावी लागते. त्यामुळे गेल्या 8 ते 10 वर्षापासून लोधळ्यांचा त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी जमिनी कसणे सोडून दिले आहे. याबाबत नेहमीच वनाधिकाऱ्यांना सांगूनही त्यांनी ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.

अशा आहेत मागण्या..
भागपूर शिवारातील संपूर्ण वनाला कुंपण करून निलगाईंना भागपूर वनक्षेत्रात सोडावे, संबंधित शिवारातील पूर्ण लोधळ्यांना पकडून शासनाने जाहीर केलेल्या व्याघ्र प्रकल्पात व अन्य वनविभागात सोडावे, नीलगाईंची उत्पत्ती थांबविण्यासाठी नर लोधळ्यांचे निर्बीजीकरण करावे, शेतकऱ्यांना लोधळ्यांना मारण्याची परवानगी द्यावी, तसेच शेतीशिवार उद्‌ध्वस्त करणाऱ्या लोधळ्यांना उपद्रवी प्राणी घोषित करावा, अशा अनेक मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. तरी येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास जूनला लाक्षणिक उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनावर गुलाबराव देवकर, पंकज महाजन, माधव पाटील, गणपत पाटील, सांडू पहेलवान, सय्यद नजीरअली, वाल्मीक पाटील, गिरीश पाचपांडे, नीलेश रोटे, सुभाष पाटील, अरुण मराठे, चारुदत्त जंगले, विनोद रंधे, चंद्रकांत पाटील, पंढरीनाथ मराठे, चंद्रकांत भोळे, मिठाराम नारखेडे, रवींद्र चौधरी, विलास चौधरी, अशोक सुर्वे, वामन चौधरी, श्रीधर झोपे, किरण देविदास चौधरी, पुरुषोत्तम बोंडे आदींच्या सह्या आहेत.

कुंपण घालण्याचे आश्‍वासन
नीलगायी उपद्रव करणाऱ्या वनाला कुंपण घालण्याबाबत वनविभागाला सांगितले जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी माजीमंत्री गुलाबराव देवकरांसह उपस्थितांना दिले आहे.

घोषणांनी दणाणला परिसर
शेतकरी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच पोलिसांनी त्यांना अडविले. शेतकऱ्यांनी काही काळ रस्यावर बसून गाड्या अडवून मागण्यांबाबत घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणून गेला होता.
काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी सोबत आणलेले डाळिंब रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. मात्र पोलिसांनी त्यांना फेकण्यास मनाई केली.

Web Title: jalgav news farmer march for wild animal bandobast