तणावमुक्तीसाठी ‘योगा’कडे वाढतोय कल!

तणावमुक्तीसाठी ‘योगा’कडे वाढतोय कल!

‘मू. जे.’च्या योग विभागात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट; १३ मुले राष्ट्रीय स्तरावर

जळगाव - आजच्या धावपळीच्या युगात वाढते प्रदूषण, सात्विक आहाराची कमतरता आणि कामाचा वाढता ताण यांमुळे प्रत्येकाला विशेषत: मानसिक आरोग्याची समस्या भेडसावत आहे. जीवनातील तणावातून मुक्ती मिळण्यासाठी अलीकडच्या काळात नागरिकांचा ‘योगा’कडे कल वाढला आहे.

यात भारतीय परंपरेतही ‘योगा’ला विशेष स्थान असून, मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी शहरांमध्ये योग मार्गदर्शन केंद्रांची संख्याही वाढू लागली आहे.

धकाधकीचे आणि धावपळीचे युग असल्याने प्रत्येकाला आता कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. अशा स्थितीत सर्वांनाच आरोग्य जपण्याची काळजी आहे. यामुळे कोणताही आजार झाला, की डॉक्‍टरांकडे जाऊन लगेच उपचार घेतला जातो; परंतु भारतात फार पूर्वीच्या काळापासून आणि भारतीय संस्कृतीचा वारसा म्हणून योगाला महत्त्व आले. डॉक्‍टरांकडून विविध उपचार झाल्यानंतर शेवटी नागरिकही योगाकडे वळू लागले आहेत.

भारतीय संस्कृतीचा वारसा असलेला योगा जागतिक स्तरापर्यंत पोहोचला असून, योगासनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आता विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. याच आधारे काही नागरिक घरबसल्या किंवा कार्यालयात तसेच पहाटेच्या वेळी फिरावयास गेल्यानंतर रस्त्याशेजारी बसून प्राणायाम, योगासन करताना निदर्शनास येत आहेत.

सोहम्‌ योग केंद्रात विद्यार्थिसंख्या वाढली
शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाची आवश्‍यकता आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये योगा हा जागतिक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास जवळपास सर्वच देशांकडून मान्यता मिळाली. तेव्हापासून म्हणजे तीन वर्षांनंतर मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम्‌ योग विभागातील विद्यार्थिसंख्या दुप्पट झाली आहे. तीन वर्षांपूर्वी साधारण शंभर ते दीडशे विद्यार्थिसंख्या होती. ती आज ३०० च्या वर पोहोचली आहे.

तेरा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर
योग शिक्षणावर काम करणारे जळगावात अनेक केंद्रे, संस्था आहेत. यातील एक जिल्हा योग समिती आहे. या समितीतील सदस्या आणि आंतरराष्ट्रीय योग पंच असलेल्या डॉ. अनिता पाटील यांच्याकडील तेरा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळण्यासाठी निवडण्यात आले. यात गेल्या वर्षी गेलेल्या पाचमधील जय पाटील याने रौप्यपदक प्राप्त केले. तसेच यावर्षी तनय मल्हाराने रिदमिक योगामध्ये सुवर्णपदक पटकाविले असून, त्याची २६ ते २९ जूनदरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल एशियन योगा चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 

देशातील ११०० विद्यालये झाली संलग्न
जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर शाळांमध्येदेखील त्यास महत्त्व येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी योगाचे स्वतंत्र धडेदेखील दिले जात आहेत. मुख्य म्हणजे देशातील ११०० केंद्रीय विद्यालये ‘स्कूल गेम ऑफ फेडरेशन’ला जोडली गेली आहेत.

योगा म्हणजे आपल्याला मिळालेली देणगी असून, तो आपल्या मानसिक स्वास्थ्याचा मूलभूत पाया आहे. योगा केल्याने शरीराला निश्‍चित फायदा होत असून, ताणतणाव कमी करण्यासाठी ही व्यायामपद्धती उपयुक्त सिद्ध झाली आहे.
- डॉ. अनिता पाटील, योग निसर्गोपचारतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय योग पंच

भारतीय संस्कृतीत मोठे योगदान म्हणजे योगा आहे. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. त्याअनुषंगाने सोहम्‌ योग विभागातून काम सुरू आहे. योग दिन साजरा करण्यास सुरवात झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- प्रा. आरती गोरे, विभागप्रमुख, सोहम्‌ योग विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com