‘गोलाणी मार्केट बंद’चे आदेश मागे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

तीन महिन्यांसाठी अकराशे शुल्क आकारणी; नंतर ठेकेदार नेमणार
जळगाव - गोलाणी व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी व्यापाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी अकराशे रुपये भरण्याचे मान्य केल्याने उपविभागीय अधिकारी जलज शर्मा यांनी ‘गोलाणी मार्केट बंद’चा काढलेला आज मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिली.

तीन महिन्यांसाठी अकराशे शुल्क आकारणी; नंतर ठेकेदार नेमणार
जळगाव - गोलाणी व्यापारी संकुल स्वच्छतेसाठी व्यापाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी अकराशे रुपये भरण्याचे मान्य केल्याने उपविभागीय अधिकारी जलज शर्मा यांनी ‘गोलाणी मार्केट बंद’चा काढलेला आज मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी आज व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिली.

श्री. शर्मा यांनी शनिवारी (१५ जुलै) ‘गोलाणी मार्केट बंद’चे आदेश दिल्यानंतर गोलाणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. आज सकाळी अकरापासून रविवार असूनही व्यापारी बांधव मोठ्या संख्येने व्यापारी संकुलात एकत्र आले. व्यापारी संकुलात लावलेला पोलिस बंदोबस्त व ‘मार्केट बंद’चा फलक पाहून गोंधळ उडाला. गोलाणी मार्केट व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, संकुलातील रहिवासी यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोबत निवेदनही घेतले. त्यात स्वच्छतेचा खर्च व्यापारी समप्रमाणात वाटून घेतील. महापालिकेने स्वच्छता, वीज, लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, उपविभागीय अधिकारी शर्मा, महापालिकेचे उपायुक्त खोसे, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.

‘बीव्हीजी, क्रिस्टल’ कंपनीचा पर्याय
श्री. निंबाळकर यांनी ‘गोलाणी’मध्ये कशी अस्वच्छता आहे, हे सविस्तर सांगितले. त्यामुळे तुमच्यासह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. स्वच्छतेची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. ती पूर्ण होत नसल्याने ‘गोलाणी मार्केट बंद’चा निर्णय घेतला. कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी ‘बीव्हीजी’, ‘क्रिस्टल’सारख्या नामांकित मात्र स्वच्छतेचा दर्जा देणाऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करावी लागेल. तेव्हाच स्वच्छता राहील. महापालिकेचे कर्मचारी स्वच्छतेचे काम करू शकणार नाहीत.

यामुळे निविदा काढल्यानंतर जी कमी दराची असेल, ती मंजूर होईल. जो खर्च येईल, तो सर्वांनी विभागून घ्यावा. संबंधित कंपनीवर व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, आयुक्त, आरोग्याधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. यावर व्यापाऱ्यांनी एकमत व्यक्त केले.

तीन महिन्यांची वेळ
निविदा काढून कंत्राटदार नेमण्यासाठी किमान दोन- तीन महिने लागतील, तोपर्यंत स्वच्छता होण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेसाठी पाचशे रुपये जमा करावेत. त्यासाठी एक वेगळे खाते तयार केले जाईल. त्या खात्याचा हिशेब पारदर्शी असेल. आयुक्त, व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरीने त्यातून रक्‍कम काढली जाईल. यावर व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली. मात्र, पाचशे रुपयांऐवजी तीनशे रुपये घेण्यावर घोडे अडले. त्यात महापौरांनी ‘एरंडोली’ करीत चारशे रुपये प्रतिमहिना घ्यावा, असे सांगितले. तीन महिन्यांचे बाराशे रुपये होतात. त्यालाही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवीत अकराशे रुपये प्रत्येकाने भरण्यावर अंतिम निर्णय झाला.

आजपासून वसुली
अकराशे रुपये वसुलीला उद्यापासून (१७ जुलै) सुरवात होईल. एकाच दिवसात ती वसुली करण्यावर भर दिला जाईल. व्यापाऱ्यांनी दुकाने पूर्ववत सुरू ठेवावीत. काही दिवस महापालिकेचे कर्मचारी, नंतर इतर कर्मचाऱ्यांतर्फे स्वच्छता केली जाणार आहे.

‘भाजी मार्केट’वरही टांगती तलवार
‘गोलाणी’च्या तळमजल्यावर भाजी व फळ विक्रेते आहेत. तेथेही त्यांच्याकडून कचरा पडतो. यामुळे ओट्यावर भाजी विक्रेत्यांना बाहेर काढून कोठे जागा द्यावयाची, यावर विचार सुरू आहे. तेथे पार्किंग करता येईल का? असाही विचार सुरू असल्याची प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी सांगितले.
 

आपत्ती व्यवस्थापन नाही
‘गोलाणी’मध्ये आग लागली तर व्यापारी, ग्राहकांना तेथून पळ काढून जीव वाचवायला जागाच नाही. आपत्ती व्यवस्थापनाची सोय नाही. वीजमीटरच्या रूममध्ये योग्य व्यवस्था नाही. मीटर रूमला आग लागल्यास मोठा धोका निर्माण होईल. यामुळे प्रत्येकाने आपले मीटर योग्य रीतीने बसवून घ्यावे, असे सांगण्यात आले.

बैठकीतील ठळक मुद्दे
प्रत्येक व्यापाऱ्याने ११०० रुपये भरावेत
स्वच्छता, लिफ्ट सुरू होणार
पाचही प्रवेशद्वारांवर प्रत्येकी दोन सुरक्षारक्षक नेमणार
पाण्याची टाकी स्वच्छ करणार
‘गोलाणी’च्या गच्चीवरील सर्व प्रवेशद्वार बंद करणार
‘गोलाणी’च्या रंगरंगोटीवर भर
‘पॅसेज’मध्ये दिवे लागणार
भाजी मार्केट हलविण्याबाबत लवकरच निर्णय
पार्किंगची समस्या सोडविण्यावरही तोडगा

Web Title: jalgav news golani market colse order cancel