पेट्रोलअभावी सरकारी दुचाकीच्या ‘पेट्रोलिंग’ची दैना

पेट्रोलअभावी सरकारी दुचाकीच्या ‘पेट्रोलिंग’ची दैना

जळगाव - जळगाव उपविभाग आणि जिल्ह्यातील ३४ पोलिस ठाण्यांत गस्तीपथक, बिट मार्शल यांना सरकारी दुचाकी पुरविण्यात येत होती.

प्रत्येक दुचाकीसाठी महिन्याला २५ लिटर पेट्रोलसह दुरुस्ती पोलिस खात्यामार्फत केली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या सरकारी दुचाकींची पेट्रोल मंजुरी पूर्णत: बंद असल्याने वाहने पोलिस ठाण्यात पडून आहेत. खासगी दुचाकींवर केवळ मोजकेच पोलिस कर्मचारी शहरात फिरतात बाकी पहाटेनंतर घरी किंवा लॉजवर पडून असल्याने शहरातील घरफोड्यांवर नियंत्रण मिळवणे जिकरीचे झाले आहे. 

जळगाव शहरात साडेपाच लाख लोकसंख्येच्या शेकडो कॉलन्या सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विभागल्या गेल्या आहेत. ग्रामीण भाग, नव्या वस्त्या, महामार्गाला लागून असलेल्या कॉलन्या, स्लम एरिया, रेल्वेस्थानक, बसस्थानकासह चोर- दरोडेखोरांचा वावर असलेले परिसर रात्रीतून तपासलेच जात नसल्याचे चित्र आहे. उघड्या घराच्या घरफोड्यांनी शाहूनगर, इंदिरानगर हौसिंग सोसायटी, हरिविठ्ठल नगर, मेस्कोमाता नगर, प्रजापत नगर, मास्टर कॉलनी, शिव कॉलनी, गणेश कॉलनीचा परिसर आदी भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. घरफोड्या रात्रीच्या चोऱ्या वाढल्या की, पोलिसांची गस्त वाढते, गस्तीची चेकिंग वाढते चोरटे मात्र पकडले जात नाही हे विशेष. उपविभागात तब्बल १८ ते २५ सरकारी दुचाकी गस्तीसाठी आहेत. बिटमार्शल, गस्तीपथकाचे कर्मचारी हद्दीतील वाट्याला आलेल्या भागात गस्तीवर निघतात. 

पोलिसांचे पेट्रोल संपले!
जिल्हा पोलिस दलात प्रत्येक पोलिस ठाण्याला दोन किंवा तीन सरकारी दुचाकी गस्ती पथकांसाठी देण्यात आलेल्या आहेत. पांढरा रंग व त्यावर काळे पट्टे असलेल्या या दुचाकींना पूर्वी महिन्याला पंचवीस लिटर पेट्रोल तीन टप्प्यांत देण्यात येत होते. एका दुचाकीवर दोन कर्मचारी वॉकीटॉकीसह गस्तीला निघत होते. मात्र या दुचाकींवर आणि फुकट मिळणाऱ्या २५ लिटर पेट्रोलवर साहेबांचे ‘खास’ कलेक्‍शन मेंबर पोलिसांच्या वाईट नजरा पडल्या. प्रत्येक पोलिस ठाण्यातील या दुचाकी त्यांनी बळकावल्या, काही महिन्यांपासून या दुचाकींना मिळणारे पेट्रोलही बंद करण्यात आले आहे. परिणामी गस्तीला फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘नाईट ड्यूटी’ आणि पोलिस ठाण्याची संपूर्ण हद्द खासगी दुचाकीवर स्वत:च्या पेट्रोलने फिरावे लागते. 

 ‘ऑलआऊट’ गस्त गुंडाळली
तत्कालीन अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या काळात घरफोड्यांचे सत्र सुरू असताना, ‘ऑल आउट’ मोहीम राबवण्यात आली. त्यात पोलिस ठाण्यातील सर्वच कर्मचारी-दुय्यम अधिकारी आणि त्यांचे प्रभारी रात्रभर गस्तीवर राहून कारवाई करीत होते. त्यांच्या जोडीला डीवायएसपी, अप्पर अधीक्षकही संपूर्ण शहरात गस्त घालून अधिकाऱ्यांच्या तपासण्या, नाकेबंदीचा आढावा घेत होते. गेल्या सहा महिन्यांपासून ‘ऑलआऊट स्कीम’ही बंद झाली आहे. 

पोलिस ठाणे नियंत्रणाबाहेर
सहा पोलिस ठाण्यांची हद्द असलेल्या जळगाव उपविभागात किमान ६० व्यापारी संकुले, बाजारपट्टा, सराफा बाजार, व्यापारी प्रतिष्ठाने, तीनशेवर बॅंका आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होऊन पोलिस निरीक्षकांची रात्रगस्त नाहीच. मध्यरात्रीनंतर एक-दोन तासांनंतर केवळ ‘वॉकीटॉकी’चे लोकेशन चालते. पोलिस व्हॅनचा एकटा चालक लाइट लावून हद्दीत फेरी मारतो. ठराविक किलोमीटर फिरल्यावर तोही पहाटे घरी जाऊन झोपतो. साध्या वेशातील भारीभक्कम ‘डीबी’ पोलिस, सर्वच पोलिस ठाण्यातील जुनी खोडं ‘डॉन पोलिस’ गस्तीला केव्हाच फस्त करतात. हद्दीत केवळ त्यांचाच वटहुकूम असल्याने चार दोन गल्ल्या फिरून झाल्या, की ओळखीच्या लॉजवर जाऊन रात्र काढायची, पहाटे रिपोर्टिंग वॉकीटॉकी जमा करायचा, नंतर घराकडे रवाना, असा सर्व गंभीर प्रकार सुरू असून संबंधित प्रभारींचेही यावरील नियंत्रण सुटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com