पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखा विक्री जोमात सुरूच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पोलिस, अन्न-औषध प्रशासन विभाग कारवाईस धजावेना 

जळगाव - शहरासह जिल्ह्यात गुटखाबंदीचे आदेश असल्यावर, सोबतच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यावरही गुटखा विक्री सर्रास सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत असून यामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशालाच एकप्रकारे ‘खो’ दिल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. 

‘गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री सुरूच’, गुटखा पोखरतेय नवी पिढी’ अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने १४ ऑगस्टला ‘थर्ड आय’ या विशेष पानातून प्रसिद्ध केले होते. गुटखा विक्री व त्यामुळे तरुणपिढीचे होणारे नुकसान यासंदर्भातील विस्तृत वृत्तांताचे वाचकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे याच दिवशी जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताची दखल त्यांच्या भाषणात घेऊन पोलिसदलासह प्रशासनाला कानपिचक्‍या दिल्या. भुसावळ येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी तसेच जळगावातही पोलिसदलाच्या ‘डिजिटल’ यंत्रणेच्या लोकार्पणाप्रसंगी त्यांनी शाळा-महाविद्यालयीन परिसरासह सर्वत्र सर्रास विकल्या जाणाऱ्या गुटख्याच्या धंद्याबाबत चिंता व्यक्त केली. 

स्थिती ‘जैसे थे’ 
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाविक्रीबाबत जिल्ह्यातील स्थिती ‘जैसे थे’ आहे. या दौऱ्यानंतर गेल्या पाच दिवसात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. कोठेही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई झाल्याचे समोर आलेले नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले आहे. आजही सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालयांबाहेरील पानटपरी दुकानांवर गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. गुटख्यामुळे नवीन पिढी कशी बरबाद होतेय, आतापर्यंत किती जणांचे बळी गुटख्याने घेतले. याबाबत सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. तरीही पोलिसदल अथवा अन्न व औषध प्रशासन कारवाईस पुढे का येत नाही? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. 

Web Title: jalgav news illegal gutkha sailing