उपअधीक्षकांनी आखली जळगावच्या गुन्हेगारांची ‘कुंडली’

उपअधीक्षकांनी आखली जळगावच्या गुन्हेगारांची ‘कुंडली’

साडेसात हजार गुन्हेगार आले ‘रेकॉर्ड’वर; ‘एमपीडीए’चा ‘फिल्टर प्लांट’ तयार

जळगाव - ज्योतिष्याने जातकाची कुंडली काढावी, त्याप्रमाणे जळगावच्या पोलिस उपअधीक्षकांनी शहरातील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या आहेत. गेले सहा महिने माहिती संकलित करून पाच वर्षांत घडलेल्या गुन्ह्यातून संशयितांचे आदर्श पद्धतीने रेकॉर्ड तयार केले आहे. खून, दरोडा, रस्तालूट, घरफोड्या, गॅंगवॉर, वाळूमाफिया, भुरटेचोर, आर्थिक फसवणुकीतील संशयित आदींच्या गुन्ह्यांना रेकॉर्डबद्ध करून सुमारे बाराशे पानांचे पुस्तकच तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे एकूण गुन्हेगारांमधून ‘एमपीडीए’साठी पात्र ठरणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्ह्याचे ‘फिल्टरेशन’ होऊन तयार रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून गुन्हेगारांचा लेखा-जोखा संकलित करण्यात येत होता. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी साडेपाच लाख लोकसंख्येला पोचणाऱ्या जळगाव शहरातून तब्बल साडेसात हजार गुन्हेगार ‘सॉर्टआऊट’ केले. केवळ एक गुन्हा दाखल असलेल्यापासून ते थेट गुन्हेगारीच उद्योग असणाऱ्यांच्या विरोधात दाखल गुन्हे मालिका, त्यात आर्थिक गुन्हे, खंडण्या, ब्लॅकमेलिंग, खून-दरोडा, घरफोडी, गॅंगवॉर, राजकीय गुन्हे दाखल असलेले, पाकिटमार, भुरटे चोर, वाळू माफिया, अवैध धंदे चालवणारे, सट्टापेढीवाले, दारूअड्डे चालवणारे आदींवर दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते आजपर्यंत (जुलै-२०१७) त्याच्या हालचालींची नोंद त्यात आहे. 

दत्तक योजनेचा आढावा
उपविभागातील सर्व सहा पोलिस ठाण्यांतर्गत डीबी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना गुन्हेगार दत्तक देण्यात आले आहेत. त्या गुन्हेगारांची गेल्या काळातील हालचाली गुन्ह्यात वाढ होऊन वाढता उपद्रव याच्यावरही आता लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दर शनिवारी प्रत्येक पोलिस ठाण्यात होत असलेल्या गुन्हेगारांची ओळखपरेड प्रसंगी ही माहिती उपयुक्त ठरणार असून जुन्या गुन्हेगारांनाही आता सावध राहण्याचे संकेत पोलिस दलाकडून लवकरच मिळतील. 

‘एमपीडीए’साठी ‘फिल्टर’   
आगामी गणेशोत्सव, बकरी ईदसाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे, त्यात हद्दपारी, चॅप्टर केसेस, प्रतिबंधात्मक कारवाईचा समावेश आहे. या सर्वांसाठीची आवश्‍यक माहिती सांगळेंच्या पुस्तकरुपी कुंडलीत पोलिस ठाणे निहाय गुन्हेगार मिळून येणार आहे.

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम अर्थात ‘एमपीडीए’ अंतर्गत संशयितास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठी आवश्‍यक दाखल गुन्ह्यांचा शुद्ध स्वरूपाचा लेखा-जोखा यात उपलब्ध आहे. गणेशोत्सवापूर्वीच रांगेत असलेल्या गुन्हेगारांवर प्रभावीरीत्या एमपीडीएची कारवाई निश्‍चितच होणार असल्याचे संकेत पोलिस दलाने दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com