सुरेशदादांचा शब्द अन्‌ महापौरांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जळगाव - नगरपालिका ते महापालिका प्रवासात १९८५ पासून जळगावात खानदेश विकास आघाडीच बहुमतात आणि सत्तेतही आहे. आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या आदेशानुसार कार्य सुरू असते. सद्यःस्थितीत महापालिकेत ‘मनसे’च्या युतीने महापालिकेची सत्ता आहे. शेवटच्या वर्षात ‘मनसे’ला महापौरपद देण्याचा जैन यांनी शब्द दिला असल्याने त्यांनी आघाडीचे महापौर नितीन लढ्ढा यांना आज राजीनामा देण्याचे आदेश मुंबईतून दिले अन्‌ सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकरांकडे राजीनामा सुपूर्द केला.

जळगाव - नगरपालिका ते महापालिका प्रवासात १९८५ पासून जळगावात खानदेश विकास आघाडीच बहुमतात आणि सत्तेतही आहे. आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या आदेशानुसार कार्य सुरू असते. सद्यःस्थितीत महापालिकेत ‘मनसे’च्या युतीने महापालिकेची सत्ता आहे. शेवटच्या वर्षात ‘मनसे’ला महापौरपद देण्याचा जैन यांनी शब्द दिला असल्याने त्यांनी आघाडीचे महापौर नितीन लढ्ढा यांना आज राजीनामा देण्याचे आदेश मुंबईतून दिले अन्‌ सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकरांकडे राजीनामा सुपूर्द केला. या प्रक्रियेतून गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला. 

महापौर नितीन लढ्ढा यांचा कालावधी अडीच वर्षांचा असल्यामुळे त्यांचा दीड वर्षाचा कार्यकाळ संपला होता. पुढील एक वर्ष बाकी असल्याने निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडी लढणार असे चित्र होते. मात्र अचानकपणे मित्रपक्ष असलेले मनसेने महापौरपदावर दावा केला. आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांनी शब्द दिल्याची त्यांनी आठवणही दिली. जैन यांनीही शब्द दिल्यानुसार महापौर लढ्ढा यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात गुरुवारीच (१७ ऑगस्ट) महापौर लढ्ढांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, याबाबत कोणतीही प्रक्रिया झाली नव्हती. जैन मुंबईला असल्यामुळे ते आल्यावरच याबाबत निर्णय होईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर दररोज त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरूच होती.

ललित कोल्हे मुंबईत
महापौरपदावर दावा सांगणारे मनसेचे नेते व उपमहापौर ललित कोल्हे यांनी थेट मुंबईत जाऊन खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांची आज भेट घेतली. त्यांच्याकडे मनसेचा दावा सांगितला. त्यानुसार जैन यांनी आज महापौरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.

लढ्ढांचा सायंकाळी राजीनामा
खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांचा आदेश आल्यामुळे नितीन लढ्ढा हे राजीनामा देणार हे निश्‍चित झाले होते. मात्र सायंकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक जितेंद्र मुंदडा व माजी नगरसेवक शरद तायडे हजर होते. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर राजीनामा स्वीकारल्यानंतर म्हणाले, महापौर लढ्ढा यांच्या समवेत पावणे दोन महिन्यात चांगला काम करण्याचा अनुभव आला. अभ्यासू व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व अतिशय नम्र असलेले महापौर आपण प्रथमच पाहिले. पिंपरी- चिंचवड महापालिकेतही काम केले. परंतु या महापौरांसमवेत काम करण्याचा अनुभव वेगळा आला. प्रशासन आणि शासन ही दोन्ही चाके समान आले तर विकास कामे मार्गी लागतात. महापालिकेत लढ्ढा यांच्या कार्यकाळात हीच स्थिती होती. आता पुढील चाकही असेच मिळाले तर विकासकामे मार्गी लागतील.
 

महापौरांचा असाही सन्मान
नितीन लढ्ढांनी प्रभारी आयुक्त म्हणून निंबाळकरांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ते त्यांच्याशी हस्तांदोलन करत लगेचच जाण्यासाठी निघाले. निंबाळकरांनी जळगावचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाचा सन्मान राखत लढ्ढांना थेट त्यांच्या वाहनापर्यंत सोडण्यासाठी आले. मुख्य इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये ज्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन असते, ते पुढे नेण्याची व लढ्ढांचे वाहन त्या जागेवर आणण्याची सूचना केली, त्यांना गाडीत बसविल्यानंतरच निंबाळकर आपल्या कामासाठी दालनाकडे रवाना झाले. 

लढ्ढा यांच्या कार्यकाळातील रचनात्मक कार्य
बजरंग बोगद्याला समांतर दोन बोगदे निर्माण करण्याकामी रुपये ३.७५ लाख खर्च. 
जैन उद्योगसमूहाची मदत घेऊन काव्यरत्नावली चौकात भाऊंचे उद्यानाची निर्मिती.
मेहरूण तलावाची गळती रोखून खोलीकरण, मजबुतीकरण व सुशोभीकरणाचे काम लोकसहभागातून केले.  
मेहरूण तलावाच्या सभोवताली ३.५ कोटी रुपये खर्च करून ९ मीटर रुंद रस्त्याची निर्मिती होणार. 
गांधी उद्यान जैन उद्योगसमूहाच्या सहकार्यातून नूतनीकरणाच्या कामाला सुरवात.
सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शाहू रुग्णालय संस्थेला चालविण्यास दिले.
लोकसहभागातून शहरातील विविध चौक, शास्त्री टॉवर, अजिंठा चौफुली सुशोभीकरण, रेल्वेस्थानक रस्त्याची कोंडी सोडविली. 
रेल्वे उड्डाण पुलाचा विषय मार्गी लावण्यास सातत्याने पाठपुरावा.
शहरातील ट्रॅफिक गार्डन व सिव्हिक सेंटरच्या जागेचा पुनर्विकासासाठी निर्णय.
मुख्यमंत्री यांच्याकडे शहरातील विकासकामांसाठी मंजूर २५ कोटी रुपये निधी मिळण्यास पाठपुरावा. 

असा झाला राजीनाम्याचा दिनक्रम
सकाळी ११.०० : महापौर लढ्ढा जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा देण्यास पोचल्याचे वृत्त. माध्यमप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजर, परंतु दुपारी एकला येणार सांगण्यात आले.
दुपारी १.०० : महापौर राजीनामा देण्यासाठी आले नाहीत. जिल्हाधिकारी नेरी येथे कार्यक्रमास असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुपारी चारची वेळ देण्यात आली.
दुपारी ४.०० : जिल्हाधिकारी गणेशोत्सवाच्या बैठकीत, यानंतर सात वाजेची वेळ सांगण्यात आली.
सायंकाळी ७.०० : जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर दालनात आले. त्यानंतर महापौर नितीन लढ्ढा साडेसातला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आले व राजीनामा दिला.

Web Title: jalgav news jalgav mayor resign