प्रचंड गदारोळात भाजप सदस्यांचा सभात्याग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

भोईटे शाळेचा मुद्दा महासभेत गाजला; मतिमंद मुले, पालकांचा चार तास ‘ठिय्या’

भोईटे शाळेचा मुद्दा महासभेत गाजला; मतिमंद मुले, पालकांचा चार तास ‘ठिय्या’
जळगाव - गेल्या अनेक वर्षांपासून उत्कर्ष मतिमंद विद्यालयातर्फे महापालिकेला भोईटे शाळा भाडेतत्त्वावर मिळण्यास पत्र देण्यात आले होते; परंतु वारंवार या संस्थेला डावलून तसेच गतिमंद मुलांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या शैक्षणिक संस्थांना शाळा देण्याचा ठराव सभेत मांडतात. या संस्थेची मागणी सभेत मांडली जात नाही. याबाबत आज भाजपच्या सदस्यांनी सभा सुरू होताच या विषयावर चर्चा करण्याचा तगादा लावला. विषय अजेंड्यावर नसल्याने चर्चा करता येणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर विरोधकांनी महापौरांच्या मनमानीचा आरोप करीत घोषणा देत सभात्याग केला, तसेच गतिमंद मुलांच्या पालकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला.

महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली महासभेला सकाळी सुरवात झाली. सभेपूर्वी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनी आंदोलन करून महापौर लढ्ढा यांना निवेदन देऊन शाळा देण्याबाबत मागणी केली. सभेच्या सुरवातीला भाजपचे सदस्य रवींद्र पाटील यांनी भोईटे शाळा उत्कर्ष मतिमंद विद्यालयाला का दिली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून त्यावर चर्चा करा, असा तगादा लावत महापौरांना घेराव घालून चर्चा करण्यास सांगितले. याबाबत हा विषय अजेंड्यावर नसून, यावर चर्चा होणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर विरोधक सदस्यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेऊन सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा आरोप करीत घोषणाबाजी करून सभागृहाबाहेर गेले. याचवेळी काही विरोधकांचा गोंधळ सुरू असताना पालकांचा सभागृह प्रवेशद्वाराबाहेर कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने गोंधळ होऊन प्रवेशद्वाराला लाथा मारून संताप व्यक्त केला. तसेच कर्मचाऱ्यांची व पालकांची धक्काबुक्की झाल्याने दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या गोंधळात सभेला सुरवात झाली.

गतिमंद मुलांचा चार तास ‘ठिय्या’
उत्कर्ष मतिमंद विद्यालयातील तीस ते चाळीस विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शिक्षकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी दहापासून आंदोलन केले. येणारे सदस्य तसेच महापौरांना पुष्पगुच्छ देऊन ‘गांधीगिरी’ने आंदोलन केले. सभा सुरू झाल्यानंतरही या विषयावर सभेत सत्ताधारी पक्षाने नकार दिल्याने सभागृहाबाहेर पालक व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की होऊन चांगलाच गोंधळ झाला. दहा मिनिटे सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सभागृहातून बाहेर पडलेले भाजपचे विरोधी पक्षनेते वामन खडके, गटनेते सुनील माळी, रवींद्र पाटील, पृथ्वीराज सोनवणे, नवनाथ दारकुंडे यांच्यासह सर्व सदस्यांनी मुलांसोबत बाहेर बसून ठिय्या आंदोलन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सभेच्या इतिवृत्तात करतात फेरफार
महासभेच्या इतिवृत्तात काही दिवसांनंतर घेतलेले ठराव, तसेच फेरफार सत्ताधारी सध्या करीत आहेत. तसेच उत्कर्ष मतिमंद विद्यालयाच्या व इतर शाळांना महापालिकेच्या शाळा भाडेतत्त्वावर देताना नंतर फेरफार करून दिल्या जाणाऱ्या भाड्याच्या रकमेत तडजोड करतात, असे आरोप नगरसेवक पाटील यांनी यावेळी केले.

अनुभूती शाळेला भोईटे शाळेची जागा देण्याचा हा सर्व खटाटोप सत्ताधारी करीत आहेत. त्यांना गरज नसतानादेखील या गतिमंद मुलांना व त्यांच्या पालकांना ही शाळेची जागा सोईस्कर पडेल. पर्यायी जागा देत आहे, तिला तीन मजले आहेत. त्यामुळे ती शाळा घेणे शक्‍य नाही. भोईटे शाळेच्या केवळ दहा खोल्या हव्या आहेत. संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दोन- तीन शाळांसाठी मागणी करीत आहेत; पण सत्ताधारी मुद्दाम दुसऱ्या संस्थांना शाळा देऊन गतिमंद मुलांवर अन्याय करीत आहेत.

- रवींद्र पाटील, नगरसेवक, भाजप

उत्कर्ष मतिमंद विद्यालयाच्या शिक्षकांसह पालकांशी सविस्तर चर्चा झाली. सभेच्या अजेंड्यावर विषय नसताना त्यावर कशी काय चर्चा करणार? तसेच त्यांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय आहे. तेथे दहा खोल्यांची शाळा देत आहोत. ती जागा मुलांना व पालकांना सोईस्कर ठरेल; परंतु मुद्दाम प्रसिद्धी तसेच आडमुठेपणाचे धोरण विरोधक करीत असल्याचे दिसून येत आहे.

- नितीन लढ्ढा, महापौर

Web Title: jalgav news The meeting of the BJP members in huge throng