शेवाळ, गाळाने भरलेल्या जलकुंभांतून होतोय पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

जळगाव - शहरास वाघूर धरणावरून येणारे पाणी गिरणा टाकी येथील जलुकंभांमध्ये साठवले जाते; परंतु त्या जलकुंभांची गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता केली नसल्याने त्यात शेवाळ, गाळ साचला आहे.

उपमहापौरांच्या पाहणीतील चित्र; महापालिकेचा शहरवासीयांच्या आरोग्याशी ‘खेळ’
जळगाव - शहरास वाघूर धरणावरून येणारे पाणी गिरणा टाकी येथील जलुकंभांमध्ये साठवले जाते; परंतु त्या जलकुंभांची गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता केली नसल्याने त्यात शेवाळ, गाळ साचला आहे. त्यामुळेच शहरातील सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येच्या जिवाशी ‘खेळ’ करणारा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आज समोर आले. उपमहापौर ललित कोल्हे यांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या जलकुंभांची पाहणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले. त्यानंतर जलकुंभ तातडीने स्वच्छ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्थायी समितीच्या सभेत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या होत्या. नागरिकांकडूनही महापालिकेला व पदाधिकाऱ्यांकडे या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमहापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे, नगरसेवक अनंत जोशी, पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गिरणा टाकी परिसरातील जलकुंभांची पाहणी केली. त्यात ब्रिटिशकालीन जमिनीलगत असलेले पाचपैकी चार जलकुंभ मोडकळीस आल्याचे दिसून आले.

या चारही जलकुंभांमध्ये एक कोटी अडीच लाख लिटर साठा केला जातो. हे जलकुंभ कचरा आणि अस्वच्छतेच्या विळख्यात असून, ते जीर्ण झाले आहेत. या जलकुंभांतून शहरातील निम्म्यापेक्षा अधिक भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार शहरातील महापालिकेच्या १६ पैकी सुरू असलेल्या १२ जलकुंभांमध्ये साठा नसल्यावर पाहणी करून ते स्वच्छतेचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

ब्रिटिशकालीन जलकुंभ धोकादायक
गिरणा टाकी येथील ब्रिटिशकालीन चारही जलकुंभ घाणीच्या विळख्यात आहेत. जलकुंभांच्या आजूबाजूला कचरा व झुडपे वाढली असून, जनावरांचा मुक्त संचार आहे. तसेच जलकुंभांवरील स्लॅबही शिल्लक नाही. झाकणच नसल्याने जलकुंभाचा भाग उघडा आहे. त्यात गंजलेल्या सळया, कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पॉलिथिनच्या बॅग पडलेल्या आढळून आल्या. आप्पासाहेब सुखदेवराव यादव जलकुंभातून कनेक्‍शन उलट्या बाजूने बसविले असल्याने पाणी गळती होत असल्याने तो जलकुंभ बंद आहे.

सुरक्षाव्यवस्था नाही
धोकादायक स्थितीत असलेल्या जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कुठलीही व्यवस्था दिसून आली नाही. काही भागातील तारांचे कुंपण कापण्यात आले आहे. जमिनीतील जलकुंभ उघडे असल्याने त्यात कुणीही काहीही टाकू शकतो, याची साधी दक्षतादेखील प्रशासनातर्फे घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

खोटेनगरचा जलकुंभ स्वच्छ करा
नगरसेवक अमर जैन यांनी खोटेनगर भागातील जलकुंभाची स्वच्छता करण्याबाबत उपमहापौर ललित कोल्हे यांना आज पत्र दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत अनेकदा सांगून त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे या जलकुंभाची स्वच्छता करावी, अशी मागणी केली आहे.

पाणीपुरवठा विभागाची आज बैठक
दरम्यान, उपमहापौर कोल्हे यांनी जलकुंभाच्या पाहणीतून पाणीपुरवठा अभियंता खडके यांना काही सूचना दिल्या आहेत. त्यासाठी खडके यांनी उद्या (२९ जून) पाणीपुरवठा विभागातील अभियंता, कर्मचाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. 

शहरातील जलकुंभ गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छ केले नाहीत. ही चुकीची बाब आहे. नियमित सफाई करणे हे प्रशासनाचे काम आहे. मात्र, अधिकारी गांभीर्याने कोणतीही गोष्ट घेत नाही. सर्व जलकुंभांची पाहणी झाल्यानंतर काय उपाययोजना करता येतील, याबाबत ठरविले जाणार आहे.
- नितीन लढ्ढा, महापौर

Web Title: jalgav news Moss, drainage filled water supply