मध्यरात्रीनंतर केव्हाही होणार गाळे ‘सील’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पथक नियुक्तीला सुरवात; सुनावणी झालेले ६५५ गाळे ‘रडार’वर

जळगाव - महापालिकेची मालकी असलेल्या २८ पैकी १८ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपली होती. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत बुधवारी (२६ जुलै) महापालिकेला मिळाली. त्यानुसार प्रशासनाकडून गाळे ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या दोन- तीन दिवसांत मध्यरात्री कुठल्याही क्षणी कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे.  त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव व पथकांसाठी कर्मचाऱ्यांची चाचपणी सुरू झाली आहे.   

पथक नियुक्तीला सुरवात; सुनावणी झालेले ६५५ गाळे ‘रडार’वर

जळगाव - महापालिकेची मालकी असलेल्या २८ पैकी १८ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपली होती. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची प्रत बुधवारी (२६ जुलै) महापालिकेला मिळाली. त्यानुसार प्रशासनाकडून गाळे ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या दोन- तीन दिवसांत मध्यरात्री कुठल्याही क्षणी कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे.  त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव व पथकांसाठी कर्मचाऱ्यांची चाचपणी सुरू झाली आहे.   

महापालिकेच्या १८ व्यापारी संकुलांच्या गाळ्यांची मुदत २००८ ला संपली. त्यानंतर महापालिकेने ठरावाच्या माध्यमातून २०१२ पर्यंत करार वाढविला होता. त्यात ३१ मार्च २०१२ ला गाळ्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा कराराने देण्याबाबत १३५ क्रमांकाचा ठराव झाला होता. परंतु गाळेधारकांनी या ठरावावर हरकत घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून गाळ्यांचा प्रश्‍न न्यायालयात, तसेच शासन दरबारी प्रलंबित होता. कराराची मुदत संपल्यानंतरही गेल्या पाच वर्षांपासून गाळेधारकांच्याच ताब्यात गाळे आहेत. गाळे ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी ८१ ‘ब’ची प्रक्रिया सुरू केली होती.

या प्रकरणात डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी जळगाव महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गाळे ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. फुले संकुलासह चार संकुलांच्या
मालकीबाबत व अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे गाळे ताब्यात का घेऊ नये, अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली होती. या नोटिशीच्या विरोधात स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, माजी स्थायी सभापती नितीन बरडे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांनीही खंडपीठात याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका एकत्र करीत औरंगाबाद खंडपीठात १४ जुलैला झालेल्या कामकाजामध्ये मुदत संपलेल्या संकुलातील गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया राबविण्याचा निकाल दिला होता. या निकालाची प्रत महापालिकेला बुधवारी मिळाली. त्यानुसार गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोणत्याही क्षणी गाळे ‘सील’ 
महापालिका प्रशासनाला खंडपीठाच्या आदेशानुसार गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे गाळेधारकांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली आहे. त्यांना सुनावणीचे निकाल देण्यात आले आहेत. सुनावणी पूर्ण झालेल्या ६५५ गाळे कोणत्याही क्षणी ताब्यात घेण्याची कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गाळे ताब्यात घेण्याची कारवाई मध्यरात्री केली जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

कागदपत्रांची जुळवाजुळव
प्रशासनाकडून गाळेधारकांना देण्यात आलेल्या नोटिसा व सुनावणीची कागदपत्रे यांची जुळवाजुळव केली जात आहे. गाळे सील करण्यासाठी लागणारे पंचनामे व इतर साहित्याची तयारी केली जात असून ही कारवाई फुले संकुलातील गाळ्यांपासून सुरू होणार असल्याचे समजते. एकावेळी विविध पथके तयार करून ही कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. पथकात कर्मचारी नेमणूक करण्याचीदेखील तयारी सुरू झाली आहे.

Web Title: jalgav news municipal shops seal anytime