आता शिस्त, सुरक्षेच्या उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

जळगाव - उकिरडा बनलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाच्या ऐतिहासिक स्वच्छता मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचे ‘अस्वच्छ’ गोलाणी व्यापारी संकुल सोमवारी (१८ जुलै) ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवून १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावत चकाचक केल्यानंतर आज प्रभारी आयुक्तांनी पुन्हा या संकुलाचा फेरफटका मारला. संकुलातील गाळेधारकांसह रहिवासी व ग्राहकांनाही शिस्त लागावी म्हणून आवश्‍यक त्या सूचना केल्या. संकुलाची स्वच्छता, देखभाल- दुरुस्तीसह सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस चौकीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जळगाव - उकिरडा बनलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाच्या ऐतिहासिक स्वच्छता मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचे ‘अस्वच्छ’ गोलाणी व्यापारी संकुल सोमवारी (१८ जुलै) ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवून १५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावत चकाचक केल्यानंतर आज प्रभारी आयुक्तांनी पुन्हा या संकुलाचा फेरफटका मारला. संकुलातील गाळेधारकांसह रहिवासी व ग्राहकांनाही शिस्त लागावी म्हणून आवश्‍यक त्या सूचना केल्या. संकुलाची स्वच्छता, देखभाल- दुरुस्तीसह सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस चौकीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आज पाहणीदरम्यान प्रभारी आयुक्त निंबाळकरांनी तळघरातील फळ, भाजीपाला विक्रेत्यांसह चौथ्या मजल्यावरील रहिवाशांना स्वच्छतेच्या सूचनांसह कारवाईचा इशारा दिला. वीज केबल, जाहिरातींचे फलक, शौचालयांची पुन्हा स्वच्छता करून सुरक्षारक्षक नेमणे व त्यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती तीन दिवसांत देण्याचे सांगितले. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खोसे, आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

भाजीपाला ओट्यांची पाहणी
प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी तळघरापासून पाहणीला सुरवात केली. यावेळी भाजीपाला, फळ विक्रेत्यांचे सामान ओट्यावर अस्ताव्यस्त आढळून आले. सामान त्वरित काढा; अन्यथा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, अशा सूचना ओटेधारकांना केल्या. सूचनांचे पालन न केल्यास सर्वांना संकुलाबाहेर काढले जाईल, तसेच आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर तर होत नाही ना, याबाबतही त्यांनी तपासणी केली.

प्रत्येकाने कचराकुंडी ठेवावी
व्यापारी संकुलातील प्रत्येक गाळेधारकाने दुकानापुढे कचराकुंडी ठेवून त्यातच घाण टाकावी. गाळ्याबाहेरील मोकळ्या जागेत कुणीही घाण टाकू नये; अन्यथा हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची तंबीही दिली. यासंदर्भात प्रत्येक व्यावसायिकाला नोटीस द्यावी, अशा सूचना आरोग्याधिकाऱ्यांना करण्यात आली. तसेच गाळ्याबाहेर असलेला कचरा, चपला, खुर्च्या व अन्य सामान बाहेर ठेवू नये, असे गाळेधारकांना बजावले.

‘महावितरण’ला देणार पत्र
व्यापारी संकुलात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या गाळेधारकांच्या दुकानाबाहेर स्वत:चे मीटर लावलेले नसेल, त्यांनी ते लावावे. संकुलातील मीटर रूम खाली करून कुलूप लावावे. आठ दिवसांत दुकानाबाहेर मीटर न लावणाऱ्याची वीजजोडणी खंडित करण्याबाबत ‘महावितरण’ला पत्र देण्याची सूचना त्यांनी केली.

स्वच्छतागृहांची केली पाहणी
व्यापारी संकुलातील प्रत्येक मजल्यावरील महिला- पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्वच्छता करूनही दुर्गंधी गेली नाही. त्यामुळे ही स्वच्छतागृहे पुन्हा स्वच्छ करण्याची गरज असून, त्यासंबंधीच्या सूचनाही श्री. निंबाळकरांनी आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या. काही स्वच्छतागृहांना जवळच्या गाळेधारकांनी कुलूप लावले असून, ते तोडून त्यांची पूर्ण स्वच्छता करावी, असेही त्यांनी बजावले.

‘फायर ऑडिट’ करणार
‘मार्केटमध्ये बसविण्यात आलेली आगरोधक उपकरणे सुरू आहेत का?’ अशी विचारणा प्रभारी आयुक्तांनी अग्निशमन दलाचे अधिकारी कोळी यांना केली. यंत्रणा बंद असल्याचे कोळी यांनी सांगताच, ‘फायरचे ऑडिट करा, दुरुस्तीचा खर्च किती येईल, याचा अहवाल आठ दिवसांत तयार करा,’ असे सांगितले. तसेच महापालिकेच्या इमारतीचा लवकरच आढावा घेण्याचे संकेत त्यांनी दिले.

रिकामे गाळे कर्मचाऱ्यांना द्या
संकुलातील वरच्या मजल्यावरील जे मोठे गाळे रिक्त पडले आहेत, त्यांची दुरुस्ती करून महापालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांना घरे नाहीत, त्यांना ती द्यावीत, असे त्यांनी सांगितले. तसेच सभागृहाची माहिती काढून त्यांची स्वच्छता, दरवाजे- खिडक्‍या दुरुस्तीबाबत पत्र देण्याचे त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना सांगितले.

मालमत्ता कराची वसुली करा
व्यापारी संकुलातील रहिवासी तसेच गाळेधारकांच्या मालमत्ता कराची माहिती काढून ती वसूल करून स्वच्छता व इतर दुरुस्ती खर्च करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

पुन्हा करणार पाहणी
महापालिकेच्या महासभेत केलेल्या ठरावानुसार जे गाळेधारक ‘स्टेबल’ केले आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊन विनापरवाना असणाऱ्यांना बाहेर काढा. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, गाळे क्रमांक, मूळ मालक, पोटभाडेकरू आदी सर्व माहिती घेऊन त्या नोंदी काढा. तसेच सर्व गाळ्यांचे मालक कोण? पोटभाडेकरू कोण? याबाबतची माहिती तीन दिवसांत काढून त्याबाबतची यादी तयार ठेवावी. पुन्हा या व्यापारी संकुलात येऊन आपण पाहणी करणार असल्याचे श्री. निंबाळकरांनी बजावले.

दंड आकारण्यासाठी चौघांची नियुक्ती
गोलाणी व्यापारी संकुलात यापुढे स्वच्छता आढळून आली नाही, तर दंड आकारून दुकाने ‘सील’ केली जाणार आहेत. तसेच महिनाभर तेथे पाहणीसाठी चार कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येणार आहे. कचरा आढळल्यास गाळेधारकांकडून दंड आकारण्यात येणार आहे. आज चौथ्या मजल्यावरील सोने व्यावसायिकाला दोन हजार, मोबाईल दुकानदारास पाचशे रुपये दंड, तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्याकडूनही दंड आकारण्यात आला.

खाऊ गल्लीजवळील रस्त्याचे डांबरीकरण
गोलाणी व्यापारी संकुलाजवळील ‘फायरच्या ऑफिस’जवळून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करावे. त्यामुळे तेथे साचणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद होईल व स्वच्छता राहील. तसेच येथील गटारीदेखील साफ कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.

पोलिस चौकीचा प्रस्ताव द्या
सुरक्षेसाठी दृष्टिकोनातून गोलाणी व्यापारी संकुलात पोलिस चौकी असणे आवश्‍यक असल्याचे मत प्रभारी आयुक्तांनी पाहणीतून आज व्यक्त केले. याबाबत संकुलातील महापालिकेच्या एका गाळ्यात पोलिस चौकी उभारण्यासाठी प्रस्ताव देण्याचे सांगितले.

‘दर्जी’ची सर्व माहिती काढा
पाहणीदरम्यान प्रभारी आयुक्तांना एका गाळ्यात अभ्यास करणारे विद्यार्थी दिसले. त्यांनी पाहणी केली असता, दर्जी फाउंडेशनचे विद्यार्थी असल्याचे सांगताच दर्जी फाउंडेशनला किती गाळे दिले, किती वापर करतात, कर किती बाकी आदी सर्व माहिती काढून दोन दिवसांत देण्याचे आदेश यावेळी दिले.

वाहनतळाची समस्याही मार्गी लावावी
गोलाणी व्यापारी संकुलात वाहनतळाची समस्यादेखील डोकेदुखी बनली आहे. रोज संकुलात हजारो ग्राहक येतात, तसेच गाळेधारकांची वाहने असतात. चार विंगच्या प्रवेशद्वारांजवळ वाहने लावली जात असल्याने पादचाऱ्यांनाही अडचणीतून मार्ग काढावा लागतो. शिवाय, या वाहनांची सुरक्षाही वाऱ्यावर असते. संकुलात विविध कार्यालये आहेत. तेथे आठ तास ड्यूटी करणारे कर्मचारी असून, त्यांची वाहने सुरक्षित नाहीत. अनेक वाहने येथून चोरीस गेली आहेत. त्यामुळे वाहनतळासह वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

प्रभारी आयुक्तांनी स्वत: उचलला कचरा!
स्वच्छता पाहणीदरम्यान संकुलात काही ठिकाणी कचरा पडला होता. तो स्वतः त्यांनी उचलला, तसेच सगळ्यांनी तुम्हाला जिथे कचरा दिसेल तुम्ही उचला, असे सांगितले. त्यावरून महापालिकेचे कर्मचारी, रहिवासी तसेच प्रभारी आयुक्तांचा अंगरक्षक, पोलिसदेखील काही ठिकाणी दिसत असलेला कचरा उचलून गाळेधारकांना कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा देत होते.

Web Title: jalgav news Now discipline, safety measures