चांगला पाऊस अन्‌ विश्‍वशांतीसाठी प्रार्थना

चांगला पाऊस अन्‌ विश्‍वशांतीसाठी प्रार्थना

रमजान ईद उत्साहात; नमाज पठण करत एकमेकांना दिल्या शुभेच्छा 

जळगाव - अल्लाह, समस्त मानवजातीवर कृपादृष्टी ठेव, चांगला पाऊस पडू दे आणि विश्‍वामध्ये शांतता व बंधुभाव वाढू दे, अशी प्रार्थना करीत सोमवारी (ता. २६) मुस्लिम बांधवांनी रमजान ईदनिमित्त ईदगाह व सुन्नी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ म्हणून शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदचा सण आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. रमजान ईद असल्याने आज शहरातील तांबापुरा, भीलपुरा, शनिपेठ, शाहूनगर या ठिकाणच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची सकाळपासून मोठी गर्दी होती. शहरातील ईदगाह कब्रस्थान ट्रस्टच्या मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना उस्मान कासमी दुआ करीत होते व त्या प्रत्येक वाक्‍यावर हजारो मुस्लिम बांधव ‘आमीन’ म्हणत होते. सर्वप्रथम इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष करीम सालार यांनी प्रास्ताविक केले. मौलाना नसीर यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सोनेल बोर्डाचे ट्रिपल तलाक, विवाहबाबत आवाहन वाचून दाखविले. मासुमवाडी येथील अबुबफ्र मशिदीसाठी चंदा करण्यात आला. 

ईदगाहमध्ये येऊन पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराडे, उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी मौलाना उस्मान कासमी, गफ्फार मलिक, फारुक शेख, करीम सालार, गनी मेमन, ताहेर शेख आदींना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुश्‍ताक शेख, रियाज मिर्झा, सलीम मोहमंद यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी काही तरुणांनी वर्षभरात घडलेल्या अप्रिय घटनांचा निषेध नोंदविण्यासाठी हातावर काळ्या फिती लावल्या होत्या.

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे ‘दुवा’

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे अंजिठा रोडवरील सुप्रिम कॉलनीतील इदगाह मैदानावर ईद-उल-फित्र (रमजान ईद) साजरी झाली. यानिमित्त सकाळी नऊला नमाजपठण करण्यात आले. मौलाना जाबीर रजा रजवी यांनी नमाज पढविली. नमाजबद्दल मौलाना नजमुक हक यांनी माहिती दिली.

नमाजानंतर दुवा करण्यात आली व संलातो सलाम पाठविण्यात आले. ईदगाहचे संस्थापक अध्यक्ष अयाज अली यांनी इदगाहबद्दल माहिती दिली. तर मौलाना मुफ्ती रेहान रजा यांनी बयान (प्रवचन) केले. याप्रसंगी मुस्लिम बांधवांकडून चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना चांगले पीक येऊ दे, देशात शांतता, भारताची प्रगती होऊ दे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अयाज अली, मौलाना जाबीर रजा रजवी, मौलाना नजमुल हक, इक्‍बाल वजीर, मौलाना अब्दुल हमीद, मोईनुद्दीन काकर आदी उपस्थित होते.

हजरत बिलाल ट्रस्टतर्फे ईद मीलन
हजरत बिलाल रजि. ट्रस्ट व खानदेशना एल्गार यांच्यावतीने पवित्र रमजान ईद, सामाजिक न्याय दिन असा एकत्रित कार्यक्रम घेऊन एकात्मता ईद मीलन व रोप वाटप कार्यक्रम घेण्यात आला. बळिरामपेठ परिसरात हा कार्यक्रम झाला. 

पाऊस, विश्‍वशांतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना 

यात ट्रस्टचे अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांच्या हस्ते गुलाबाचे रोप वाटप करण्यात आले. याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव, लक्ष्मण पाटील, नीलेश बोरा, रवी पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, नीलेश बारी, प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते. तसेच अजिंठा चौकाजवळील मुस्लिम ईदगाहवर देखील आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हिंदू- मुस्लिम बांधवांना गुलाबाचे रोप वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यक्रम
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफ्फार मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कल्पना पाटील, शहर अध्यक्षा मीनल पाटील, संदीप पवार, ॲड. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com