बनावट पावत्यांवर वाळूचा अवैध धंदा जोरात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

जळगाव - वाळूमाफियांनी शहरात रान माजविले आहे. महसूल प्रशासनासह पोलिसांनाही गुंगारा देण्यात वाळूचोर यशस्वी होत असून, चोरीची वाळू वाहतूक करण्यासाठी आता बनावट पावत्यांचा आधार घेत असल्याचे तहसीलदारांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाळधीसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जळगाव - वाळूमाफियांनी शहरात रान माजविले आहे. महसूल प्रशासनासह पोलिसांनाही गुंगारा देण्यात वाळूचोर यशस्वी होत असून, चोरीची वाळू वाहतूक करण्यासाठी आता बनावट पावत्यांचा आधार घेत असल्याचे तहसीलदारांच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाळधीसह जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जळगाव तालुक्‍यासह जिल्ह्यात वाळूचोरट्यांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसह महसूल विभागाच्या तपासणीत वाळूचोरांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून आज पाळधी औटपोस्टसह जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात वाळूचोरी प्रकरणांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गिरणा नदीपात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतुकदांरावर गुन्हे दाखल होत असून आज चक्क पाळधी औटपोस्टला तलाठी अनिल सुरवाडे यांनी बनावट रॉयल्टी पावतीसह ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले आहे. सुरवाडे यांच्या तक्रारीवरून योगेश जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास खुशाल पाटील करीत आहे.

पावत्या ठेक्‍यावरुन घेतल्या
दिलेली पावती बनावट आहे की खरी, याबबत वाहनचालक अनभिज्ञ असतो. त्याला केवळ गाडीत भरलेली वाळू इकडून तिकडे नेण्याची जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे संबंधित ठेकेदारावरही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे एका ट्रॅक्‍टरचालकाने सांगितले.

‘सेटलमेंट’चा प्रयत्न फसला
प्रभात कॉलनी चौकात (एमएच.१९. एपी. ५३३९) वाळूने भरलेल्या या ट्रॅक्‍टरचालकाकडे पावतीच मिळून आलेली नसल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचे ठाणेअंमलदारांनी सांगितले. वास्तविक दिवसा कारवाई झालेल्या या प्रकरणात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री अकरापर्यंत गुन्हाच दाखल झाला नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांच्या मदतीने आपसांत प्रकरण मोडण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. शहरातील नामवंत वाळूमाफिया दुपारपासूनच पोलिस ठाण्यात आपआपल्या पद्धतीने प्रकरण मिटविण्याच्या प्रयत्नात होते. याचदरम्यान पाळधी औटपोस्टला बनावट पावतीचा गुन्हा दाखल झाल्यावर, या गुन्ह्यातील दुसरी बनावट पावती हातोहात तक्रारीतून आणि गुन्ह्यातूनही गायब झाल्याचे विश्‍वसनीय पोलिस सुत्राद्वारे माहिती मिळाली.

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
तहसीलदार अमोल निकम यांच्या तक्रारीवरून चालक भिका सोनवणे याच्याविरुद्ध रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळूचोरी प्रकरणी डंपरचालकास कोठडी
जळगाव - गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आलेल्या डंपरचालक- मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालक संदीप ऊर्फ भुरा मधुकर कोळी याला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली. गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून वाहतूक करताना मध्यरात्री तलाठ्यांनी डंपर (एमएच १९, झेड ४८५८) अडवून तपासणी केली. चालकाकडे पावती नसल्याने डंपर जप्त करून तलाठी अनिरुद्ध रमेश खेदमाळस यांच्या तक्रारीवरून चालक संदीप ऊर्फ भुरा मधुकर कोळी, मालक संतोष बाबूराव कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चालकाला अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर संशयित चालक संदीप कोळीला न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: jalgav news sand illegal business on bogus receipt