सर्वाधिक तूर विकणाऱ्या शंभर शेतकऱ्यांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

जळगाव - जळगाव जिल्ह्यात सरकार व "नाफेड'तर्फे तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यानुसार जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या केंद्रांवर ज्यांनी सर्वाधिक तूर विकली असेल, असे शंभर शेतकरी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे. त्यांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे.

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. 30) सुमारे एक लाख 26 हजार क्विंटल तूर खरेदी झाली होती. बुधवारपर्यंत तूर खरेदीचा सरकारचा आदेश होता. तूर खरेदी केंद्रे सुरू पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहणार आहेत. जामनेर केंद्रावर आज सायंकाळी पाचपर्यंत साडेतीन हजार क्विंटल तूर आली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणलेल्या तुरीसोबत सातबारा उताराही आणला होता. मात्र, नेमकी ती तूर त्याच शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची, हे तपासण्यासाठी चारही केंद्रांवर सर्वाधिक तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित तालुका सहाय्यक उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मागितली आहे. संबंधित शेतकऱ्याने तुरीचा केलेला पेरा व विकलेली तूर याबाबत माहिती कळाल्यानंतर तसा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

Web Title: jalgav news tur sailer 100 farmer inquiry