आरोग्य विभागाकडून दोन गावांना ‘रेड कार्ड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साथरोग नियंत्रण कक्ष; १५ गावांत ‘टीसीएल’ उपलब्ध नाही
जळगाव - पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची उत्पत्ती आणि साथरोगांना आमंत्रण मिळते. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. तालुकास्तरावर साथरोग नियंत्रण पथके नेमून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वारंवार सूचना देऊनही आरोग्याबाबत सुधारणा न करणाऱ्या आव्हाणे (ता. जळगाव) आणि मेहंदळे (ता. भडगाव) या गावांना ‘लाल कार्ड’ देण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वांनाच पावसाची आस लागून आहे. परंतु, पावसाळा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे चिकन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, डायरियासारखे आजार डोके वर काढतात. हे साथरोग नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर मॉन्सून व्यवस्थापनात डास उत्पत्ती रोखण्यावर विशेष भर दिला जातो. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य केंद्रांना डास उत्पत्ती रोखण्यासाठी आणि आजारांचा प्रसार झाल्यास खबरदारीच्या उपायांसाठी सज्ज ठेवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

१५ गावांत टीसीएल पावडरच नाही
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला पाण्याचे नमुने तपासले जातात. मे महिन्यातील अहवालानुसार १ हजार ३७६ पैकी ९५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले तर टीसीएल पावडरच्या तपासणीसाठी २२५ नमुने घेण्यात आले असून, यातील ७१ नमुन्यांमध्ये क्‍लोरिनचे प्रमाण हे २० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहेत. या तपासणीतच जिल्ह्यातील पंधरा गावांमध्ये टीसीएल पावडर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. यात चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक ७ गावे असून, जामनेर तालुक्‍यातील ३, चोपडा २, एरंडोल, मुक्‍ताईनगर आणि यावल तालुक्‍यातील प्रत्येकी एक गावाचा समावेश आहे.

शहरातही आपत्कालीन कक्ष
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणासाठीची तयारी सुरू केली आहे. स्वतंत्र पथक तयार करून यासाठीचा आपत्कालीन कक्ष महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात तयार करण्यात आला आहे. येथे साथरोगासाठी लागणाऱ्या औषधींचा साठादेखील ठेवण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींना पत्र
ग्रामीण भागात प्रामुख्याने जलवाहिन्यांमध्ये गळती असते. पावसाळ्याच्या दिवसात डबके साचल्याने सांडपाणी गळक्‍या जलवाहिन्यांमध्ये शिरून अशुद्ध पाणीपुरवठा होतो. अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने अतिसार, मलेरिया यासारख्या आजारांचा फैलाव होतो. गेल्या वर्षी आव्हाणे येथे अशाच प्रकारामुळे अनेकांना अतिसाराची लागण झाली होती. दक्षता म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींना जलवाहिन्यांची गळती असल्यास दुरुस्तीसाठीचे पत्र देण्यात आल्याचे डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: jalgav news two village red card by health department