जलशुद्धीकरण केंद्रातून नव्हे; सदोष वाहिनीतून दूषित पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

शहरात दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, राजकीय वर्तुळातही या प्रश्‍नावरून वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या उमाळे (ता. जळगाव) येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. त्यात दूषित पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रातून नव्हे; तर महापालिकेच्या सदोष जलवाहिन्यांमधून होत असल्याचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी सांगितले.

उपमहापौर ललित कोल्हे यांनी आज सकाळी शहरातील गिरणा टाकीची पाहणी केली. दुपारी भाजपच्या सदस्यांनी दूषित पाण्याबाबत उमाळे येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. यामध्ये विरोधी पक्षनेते वामन खडके, गटनेते सुनील माळी, पृथ्वीराज सोनवणे, अनिल देशमुख, किशोर बाविस्कर, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, पिंटू काळे आदी उपस्थित होते. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील सहाय्यक केमिस्ट चंद्रकांत पाटील व क्‍लोरिन ऑपरेटर सुनील अत्तरदे यांच्याकडून पाणी शुद्ध करण्याबाबतची माहिती घेतली, तसेच पाणी कसे शुद्ध करतात, याबाबतचे प्रात्यक्षिकदेखील बघितले. प्रक्रिया केल्यानंतर पाणी ७२ तास शुद्ध राहते; परंतु त्यानंतर पिवळसरपणा व जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने दुर्गंधी येते. त्यातच महापालिकेच्या २० ते ३० वर्षांपासूनच्या जुन्या जलवाहिन्या व ड्रेनेजच्या जलवाहिन्या निकृष्ट झाल्या असून, त्यात शेवाळ असल्यानेही पाण्याला दुर्गंधी व पिवळसरपणा येत असल्याचे पाहणीतून दिसून आले.

जलवाहिनी, व्हॉल्व्ह बदलण्याची गरज
वाघूर धरणातून टाकलेली जलवाहिनी २० ते ३० वर्षे जुनी आहे. त्यात अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या सिमेंटच्या जलवाहिन्या असल्याने त्या वारंवार फुटतात. त्यातच सिमेंटच्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात शेवाळ लागले आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. जर त्यावेळी ‘पीव्हीसी’ची जलवाहिनी वापरली असती, तर शहरवासीयांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली नसती, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: jalgav news uncleaned water supply