धनगर आरक्षणासाठी विधानभवनाला घेराव - अण्णासाहेब डांगे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

जळगाव - धनगर समाजाला अनुसूचित जातीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आगामी अधिवेशनात विधानभवनाला सुमारे दीड लाख धनगर समाजबांधव घेराव घालतील. एकाही मंत्री आणि आमदाराला विधानभवनात जाऊ देणार नाही. याच मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डांगे म्हणाले, 'गेल्या 61 वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. जो सत्तेत येतो तो आरक्षणाचे आश्‍वासन देतो. पूर्ण कोणी करीत नाही. सरकारची मदत न मिळाल्याने समाजातील 90 टक्के नागरिक हलाखीचे जीवन जगत आहे. सरकारने त्यांचे औद्योगिक पुनर्वसन केले असते तर आज त्यांना चांगले जीवन जगता आले असते.''

जनजागृती अभियान
'धनगर समाज बांधवांमध्ये आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, त्यांची मते जाणून घ्यावीत व एकमताने आणखी काही वेगळ्याप्रकारे आंदोलन करता येईल का? या अनुषंगाने मते जाणण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून जनजागरण अभियान सुरू केले आहे. पंधरा जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे मार्गदर्शन मेळावे घेण्यात येतील,'' असे त्यांनी नमूद केले.

Web Title: jalgav news vidhansabha agitation for dhangar reservation