जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी वॉर्ड!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केली पाहणी; सिटी स्कॅनसाठी ट्रान्स्फाॅर्मर चार्ज करण्याच्या सूचना

जळगाव - जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या अधिक असून, त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात ‘एनआरएचएम’अंतर्गत नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीत ‘एनआरसी’ सेंटर म्हणजे कुपोषित बालकांसाठी कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासह रुग्णालय आवारातील समस्यांची पाहणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली.

जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केली पाहणी; सिटी स्कॅनसाठी ट्रान्स्फाॅर्मर चार्ज करण्याच्या सूचना

जळगाव - जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या अधिक असून, त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात ‘एनआरएचएम’अंतर्गत नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीत ‘एनआरसी’ सेंटर म्हणजे कुपोषित बालकांसाठी कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासह रुग्णालय आवारातील समस्यांची पाहणी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली.

जिल्हा रुग्णालयात आज दुपारी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सर्व विभागांची पाहणी करून दुरुस्तीच्या कामांची पाहणी करीत त्यात दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. विजय जयकर, ‘पीडब्ल्यूडी’चे अभियंता सूर्यवंशी उपस्थित होते. यात जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या कुपोषित बालकांसाठीच्या कक्षाची पाहणी करून काम लवकर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिल्या. तसेच रुग्णालयातील पोलिस चौकीचा आकार वाढविण्याच्या दृष्टीने प्लायवूड आणि पत्र्यांच्या सहाय्याने सोमवारपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

वॉर्ड दुरुस्तीसाठी ७५ लाख
जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७, ८ आणि ९ यामध्ये घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. शिवाय, दाखल रुग्णांसाठी तेथे पुरेशा सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने दुरुस्तीचे काम रुग्णालय प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ७५ लाखांचा खर्च अपेक्षित असून, त्याची पाहणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी खर्चाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या; त्याचप्रमाणे रुग्णालय आवारात भुयारी गटारी बांधकामासही जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा सिग्नल दिला आहे.

लवकरच सिटी स्कॅन सुविधा
रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिनचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रखडला आहे. रुग्णालयात मशिन येऊनही त्याचात्प्रारंभ अद्याप झाला नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे ते सुरू होण्यास विलंब होत आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेची पाहणी करत सिटी स्कॅन मशिन लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी आवश्‍यक असलेल्या ट्रान्स्फॉर्मरला चार्ज करून देण्याबाबत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. ट्रान्स्फॉर्मर चार्ज केल्यानंतर मशिन सुरू करण्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

‘एआरटी’ सेंटरला २५ संगणक
रुग्णालय आवारात एड्‌सबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र एआरटी सेंटरची इमारत आहे. या इमारतीचीही पाहणी करीत तिच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णांना बसण्यासाठी पत्री शेड आणि खुर्च्यांची सुविधा, आवारात महिला व पुरुषांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधकाम करण्यास होकार दर्शविला असून, यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तसेच एड्‌सग्रस्तांची माहिती ‘अपडेट’ ठेवण्यासाठी विभागाला २५ संगणक आणि २५ प्रिंटर देण्यास मंजुरी दिली.

अनधिकृत निवासस्थाने खाली करण्याचे आदेश
जिल्हा रुग्णालय आवारात कर्मचारी निवासस्थाने आहेत. तेथे रुग्णालयातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा आजही अधिवास आहे. ही बाब पाहणीदरम्यान लक्षात आली. अशा कर्मचाऱ्यांची निवासस्थाने लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. भामरे यांना दिले असून, हे काम न झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: jalgav news Ward for malnourished children in District Hospital!