पाणी योजना वीस दिवसांत सुरू करा - गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

जळगाव - वाघनगर परिसर सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. वाघनगर परिसरातील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सुमारे १९ कोटी २६ लाख ६० हजार रुपये मंजूर आहेत.

जळगाव - वाघनगर परिसर सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. वाघनगर परिसरातील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सुमारे १९ कोटी २६ लाख ६० हजार रुपये मंजूर आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या वीस दिवसांत सुरवात करावी, असे आदेश सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले.
याबाबत आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात राज्यमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषदेचे सदस्य पवन सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य तुषार महाजन, नंदू पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, तहसीलदार अमोल निकम, प्रवीण पाटील, भगवान पाटील, भोजू महाजन, खेमचंद महाजन, संजय ढाके, संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता जी. टी. राजपूत, एस. आर. राऊत, महापालिकेचे डी. एस. खडके यांच्यासह उमाळे, रायपूर, कंडारी या गावांचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतींचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

वाघनगर परिसरातील सततच्या पाणीटंचाईबाबत रहिवाशांनी राज्यमंत्री पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती. या समस्येची तत्काळ दखल घेऊन राज्यमंत्री पाटील यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्यामुळे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत १७ फेब्रुवारी २०१७ ला पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

तीन जलकुंभ बांधणार
या कामांतर्गत एक लाख लिटर साठवण क्षमतेचे दोन जलकुंभ, तर साडेतीन लाख लिटर साठवण क्षमतेचा एक जलकुंभ बांधण्यात येणार आहे. कोल्हे हिल्सवर जलशुद्धीकरण केंद्र, वाघूर धरणावरून जलवाहिनी आणणे आदी कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी राज्यमंत्री पाटील यांनी बोलणे करून महापालिकेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी भाडे न आकारता ती विनामूल्य देण्याचे सांगितले. यावर महापौरांनी आम्ही तसा ठराव करून घेणार असल्याचे आश्वासन दिले.

असोदा येथे क्रीडा संकुल
असोदा (ता. जळगाव) येथे होणाऱ्या संभाव्य क्रीडा संकुलाबाबतदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या. क्रीडा संकुलासाठी पाच हेक्‍टर जागा तहसीलदारांच्या उपस्थितीत उपलब्ध करून घ्यावी. उपलब्ध असलेल्या निधीतून त्या जागेला संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी दिल्या.

Web Title: jalgav news water scheme start in 20 days