25 कोटींच्या निधीतील कामे करणार कोण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विविध कामांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून कामांचे अंदाजपत्रक काढण्याचे सांगितले होते. यावर महापालिकेकडून अंदाजपत्रक काढण्याचे काम सुरू आहे. तसेच हे काम करणार कोण यात देखील वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

महानगरपालिकेची आर्थिकस्थिती बिकट असल्यामुळे विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटींचा निधी जाहीर केल्यानंतर मंजुरीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या 25 कोटीच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. पालकमंत्री पाटील हे 21 मार्चला जिल्हा दौऱ्यावर आले असता 25 कोटी रुपयाच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी निधीचे विभाजन करण्यात आले.

त्यानुसार एलएडी पथदिव्यांसाठी 10 कोटी, गटारींसाठी 7 कोटी, भूमिगत केबल टाकण्यासाठी 3 कोटी आणि नाल्याच्या काठावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 4 कोटी असे एकूण 25 कोटीच्या निधीचे विभाजन करण्यात आले. परंतु प्रस्ताव मंजूर केला; पण हे काम महापालिका करणार का सार्वजनिक बांधकाम विभाग करणार, याचे स्पष्ट आदेश दिले नाही. तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र तसे महापालिकेला दिले आहे. त्यानुसार महापालिकेकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. कामे मंजूर असली तरी हे कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार की महापालिका करणार यामध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

मंजूर गटारी कामे नव्या वसाहतीत
25 कोटीच्या निधीच्या कामांबाबत शनिवारी पालकमंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत 7 कोटीमधून शहरातील 37 प्रभागांमध्ये 230 गटारी बांधण्यासाठी प्रस्तावावर चर्चा झाली. यात अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार प्रकल्पात येणाऱ्या गटारी वगळून शहरात नवीन परिसरात गटारी करण्याचे काम या निधीतून करण्याबाबत चर्चा झाली. तसेच 138 कोटीचा भूमिगत गटारींच्या प्रकल्पाची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाचा अंदाजित आराखड्याची माहिती दिली. यात लेंडी नाल्याला लागून मोठी वाहिनी टाकून शहरातील इतर परिसरातून येणाऱ्या भूमिगत गटारी या वाहिनीला जोडल्या जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोराजे निंबाळकर, आयुक्त जीवन सोनवणे, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.

Web Title: jalgav news Who will do 25 crores of fund?