दंड दुप्पट, तरीही वाहतूक नियम सर्रास धाब्यावर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पोलिस, परिवहन यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत; अपुऱ्या बळाचे कारण पुढे

जळगाव - वाहतूक नियमांचे शिस्तीने पालन व्हावे म्हणून प्रत्येक नियमाच्या बाबतीत दंडाच्या रकमेत शासनाने भलीमोठी वाढ केलेली असताना, वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याचे प्रकार कमी व्हायला तयार नाहीत. दुर्दैवाने डोळ्यांदेखत हे प्रकार सुरू असताना पोलिस वा परिवहन यंत्रणा बघ्याच्या भूमिकेपलिकडे जाऊन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. अपुऱ्या कर्मचारीबळाचे कारण यासाठी सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात पोलिस दिवसभर चौकाचौकांत नेमके काय करतात, याचे चित्र दररोज अनुभवायला मिळते. 

गेल्या दहा वर्षांत रस्त्यावर दहापट वाहने उतरल्याचा अंदाज परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अलीकडचा विचार केला, तर यंदा समाधानकारक पावसाने पीक-पाणी चांगले झाल्याने दोन वर्षांतील मंदी धुवून काढत वाहन बाजारपेठेने जळगाव जिल्ह्यात दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल पाच हजार नवी वाहने रस्त्यावर उतरवली. 

स्वाभाविकच या वाढत्या वाहनांचा भार रस्त्यांना सोसवत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही वाहनधारकांकडे थांबण्यासाठी म्हणून थोडाही वेळ नसल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून ही वाहने रस्त्यांवरून धावत सुटतात व अपघातांचे कारण बनतात. वाढत्या वाहनांमुळे एकूणच वाहतुकीची समस्या अत्यंत तीव्र बनली आहे, आणि वाहतूक सुरळीत करणे आता ना वाहतूक शाखेच्या क्षमतेत राहिले आहे ना परिवहन विभागाच्या. 

दुप्पट दंडाचा उपयोग काय?
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी महिनाभरापूर्वीच कायद्यात बदल करून प्रत्येक नियमासाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली. काही नियमांसाठी दुप्पट, तर काहींसाठी दहापट वाढ करण्यात आली. मात्र, या कायद्याची अंमलबजावणीच कठोरपणे होत नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. 

अपुऱ्या बळाचे कारण
वाहतुकीच्या समस्येबाबत पोलिस यंत्रणेला वारंवार दोषी धरले जाते. मात्र, पोलिसांकडूनही अपुऱ्या बळाचे कारण पुढे केले जाते. जळगावसह जिल्ह्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने पुरेसे संख्याबळ नसल्याने वाहतूक समस्या कायम आहे, असा दावा पोलिसांकडून केला जातो. परंतु, याच पोलिस यंत्रणेतील चार-पाच कर्मचारी जमून एकत्रितपणे काही ठिकाणी गरज नसताना तपासणी करीत दिवस घालवतात, याबद्दल ते काय स्पष्टीकरण देतील?

मोबाईल तपासणीचे वादग्रस्त प्रकरण
पोलिस यंत्रणेकडून सामान्य वाहनचालकांच्या मोबाईल तपासणीचे प्रकरण सध्या गाजत आहे. पोलिसांना तसा अधिकार किंवा कायद्यात तशी तरतूद आहे का, यावरही चर्चा सुरू आहे. मात्र, हे सर्व प्रकार करण्यासाठी पोलिसांकडे वेळ व बळ आहे, मग एखाद्या चौकात झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यंत्रणा नाही, हे म्हणणे कितपत योग्य आहे असाही प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgav traffic congestion