‘ई-पॉज’ न वापरणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जळगाव - भुसावळ शहरासह तालुक्‍यात अनेक रेशन दुकानदार धान्य वितरणासाठी ‘ई- पॉज’ यंत्राचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुरवठा निरीक्षकांनी तातडीने अशा दुकानदारांवर कारवाईचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाला पाठवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी आज भुसावळ येथे झालेल्या रेशन दुकानदारांच्या बैठकीत दिले.

जळगाव - भुसावळ शहरासह तालुक्‍यात अनेक रेशन दुकानदार धान्य वितरणासाठी ‘ई- पॉज’ यंत्राचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुरवठा निरीक्षकांनी तातडीने अशा दुकानदारांवर कारवाईचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाला पाठवावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी आज भुसावळ येथे झालेल्या रेशन दुकानदारांच्या बैठकीत दिले.

रेशन दुकानांतून ‘ई- पॉज मशिन’द्वारेच धान्याचे वितरण कार्डधारकांना करावे, अशा सूचना असताना भुसावळ तालुक्‍यात ‘ई- पॉज मशिन’द्वारे धान्याचे वितरण होत नसल्याचे आढळून आले. यामुळे दुकानदारांची बैठक घेऊन ‘ई पॉज मशिन’चा वापर न करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल, अशा इशारा श्री. जाधव यांनी दिला. तहसीलदार विशाल नाईकवडे, भुसावळ पुरवठा विभागाचे निरीक्षक, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘क्‍लोज’ बटन दाबल्याने कारवाई
भुसावळ शहरातील रेशन दुकानदार माखाजी हे ‘ई पॉज मशिन’मधील ‘क्‍लोज’चे बटन दाबून रेशन मालाची विक्री करताना आढळून आले. त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश जागेवरच पुरवठा अधिकारी जाधव यांनी दिले आहेत. ‘ई पॉज मशिन’चा वापर न करता चिठ्ठ्यांद्वारे धान्य वितरण करणाऱ्या म्हसावद (ता. जळगाव) येथील सुनीता अमृतकर, रवींद्र शिसवे, संजय वाणी यांच्या दुकानांवर पुरवठा विभागाने रविवारी (ता. २०) दुपारी अचानक छापा टाकून कारवाई केली होती. सहाय्यक पुरवठा अधिकारी विलास हरिमकर, योगेश पाटील, किशोर पवार, ‘ओयॅसिस’चे सुरेंद्र भोळे यांच्या पथकाने या दुकानदारांचे ‘मशिन’ सील करून जळगावला आणले आहेत. सोबतच त्यांचे परवाने निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.

मुक्ताईनगरला दोघांचा सत्कार
पुरवठा अधिकारी जाधव यांनी मुक्ताईनगरलाही रेशन दुकानदारांची बैठक घेतली. त्यात ३५० पैकी ३२६ रेशन कार्डधारकांना ‘ई पॉज मशिन’द्वारे धान्य वाटप झाल्याचे आढळून आले. यामुळे दोन रेशन दुकानदारांचा सत्कार पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी केला.

निरीक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव 
जळगावचे तालुका पुरवठा निरीक्षक दीपक कुसकर, श्री. तडवी, श्री. जाधव यांनी तालुक्‍यात धान्य दुकानांच्या निरीक्षणात वरील दुकानदारांवर कारवाई का केली नाही, याबाबत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

Web Title: jalgavon news Action on ration shoppers not using e-pause