रेल्वेत चोऱ्या करणारी  अमरावतीची टोळी अटकेत

रेल्वेत चोऱ्या करणारी  अमरावतीची टोळी अटकेत

रेल्वेत चोऱ्या करणारी 
अमरावतीची टोळी अटकेत 

जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरून महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने अकोला जात असलेल्या नितीनकुमार विलास चौधरी (रा. नेरीनाका, तुकारामवाडी) यांचा मोबाईल, व 330 रुपये असलेले खिशातील पाकीट असा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. पाकीट व मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार चौधरी यांनी केल्यावर जळगाव लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन संशयितांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे तिघेही अमरावती येथील असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 

नितीनकुमार चौधरी हे अकोला जाण्यासाठी मंगळवारी सकाळी जळगाव स्थानकावर आले. महाराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल, पॅंटच्या खिशातील पाकीट लंपास करून पोबारा केला. घडल्या प्रकाराची तक्रार चौधरी यांनी केल्यावर पोलिस निरीक्षक दिनकर डंबाले यांच्या पथकातील पोलिस नाईक अनिंद्र नगराळे, रामराव इंगळे, रवींद्र ठाकूर, रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार प्रसाद सिंग, भूषण पाटील, महेंद्र कुशवाह यांनी अवघ्या काही तासातच रेल्वे स्थानकावरून संशयास्पद फिरणाऱ्या सईदखान बादरखान (वय 50), प्रवीण विजय चौधरी (वय-21 दोघे रा. अमरावती) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, मुद्देमाल घेऊन साथीदार एक्‍स्प्रेसने भुसावळकडे रवाना झाल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तिसरा संशयित सुरेश गोपाळराव अगले (वय 45) यास भुसावळहून ताब्यात घेतले. तिघांची झडती घेतल्यावर मोबाईल तसेच पाकीट मिळून आले. 

नागपूर- मुंबई चोरीचा धंदा 
मध्यरेल्वेच्या नागपूर- मुंबई मार्गावर धावणाऱ्या विशिष्ट गाड्यांमध्ये अटकेतील टोळीचे प्रस्त आहे. एकाच वेळेस तीन-तीनच्या गटाने पाळत ठेवत प्रवाशांचे पर्स मोबाईल हिसकावून हे भामटे पसार होतात. रेल्वेस्थानकावर गाडी धावण्याच्या अगोदर काही सेकंदातच काम फत्ते करीत ही टोळी पोबारा करत असून अमरावती जिल्ह्यात अटकेतील तिघांवर असंख्य गुन्हे असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली आहे. संशयितांना बुधवारी (ता. 23) भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
...............
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com