रेल्वेस्थानकावर पकडला अवैध मद्यसाठा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रेल्वेस्थानकावर पकडला अवैध मद्यसाठा 

रेल्वेस्थानकावर पकडला अवैध मद्यसाठा 

जळगाव : शहरातून चंद्रपूर येथे देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या मोनू मदत भाट (वय 28, रा. कंजरवाडा) याला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 39 हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. 
कंजरवाड्यातील रहिवासी मोनू मदन भाट हा जळगाव येथून चेन्नई एक्‍स्प्रेसने देशी दारू चंद्रपूर येथे घेऊन जाण्यासाठी फलाट क्रमांक पाचवर उभा होता. यावेळी त्याच्याकडे सुमारे आठ प्रवासी बॅगा होत्या. दरम्यान, मोनू संशयितरीत्या रेल्वेस्थानकावर उभा असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक जी. एस. घिगे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ नीलेश अढवाल, रिबन अहमद, प्रमोद सांगळे, विक्रम वाघ, नीलेश गिरासे यांचे पथक तयार करून संशयिताची चौकशी करीत त्याच्याकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली. 

पंधराशे दारूच्या बाटल्या 
मोनूकडे असलेल्या आठ प्रवासी बॅगांमध्ये सुमारे 15 बॉक्‍समध्ये 1500 नग दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, त्याची किंमत सुमारे 39 हजार रुपये इतकी आहे. 

उत्पादन शुल्क विभागाने घेतले ताब्यात 
रेल्वेस्थानकावरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यास अटक केल्याचे समजातच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक संजय कोल्हे, मुकेश पाटील, विठ्ठल हटकर, सागर देशमुख, नंदू पवार यांनी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या मोनू भाट यास उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले. 

जळगाव ते चंद्रपूर साखळी 
चंद्रपूर येथे दारूवर बंदी असल्यामुळे जळगावातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जाते. तसेच चंद्रपूर येथे हीच दारू छापील किमतीपेक्षा जादा दराने त्याची विक्री केली जात असून ही संपूर्ण साखळी असल्याची प्राथमिक माहिती उत्पादन शुल्काकडून प्राप्त झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news daru satha pakdla