गाळेधारकांना खंडपीठाचा पुन्हा दणका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

गाळेधारकांना खंडपीठाचा पुन्हा दणका 

गाळेधारकांना खंडपीठाचा पुन्हा दणका 

जळगाव ः महापालिकेची कारवाई व कलम 81 "ब' नोटिशीविरोधात 21 गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होऊन न्यायालयाने गाळेधारकांना पुन्हा दणका देत 18 नोव्हेंबरपर्यंत 10 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. 
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांची 2012 ला मुदत संपली होती. फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना 81"ब'ची नुकसान भरपाईची नोटीस बजावून 11 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली होती. यात फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील 21 गाळेधारकांनी देखील औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी न्यायाधीश बी. एच. घुगे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायाधीशांनी 21 गाळेधारकांना 18 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. महापालिकेकडून ऍड. व्ही. डी. गुनाडे, गाळेधारकांकडून ऍड. कपन थत्ते यांनी कामकाज पाहिले. 

यापूर्वीही दणका 
महापालिकेने 14 ऑक्‍टोबरला तीन गाळे सील केले होते. मात्र, कारवाईच्या वेळी अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर फुले मार्केटमधील पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या गाळे "सील'च्या कारवाईला (नोटीस कलम 81 "क') स्थगिती मिळावी, यासाठी धाव घेतली होती. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 26 ऑक्‍टोबरपर्यंत 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन गाळेधारकांनी पैसे भरले तर दोन गाळेधारकांचे प्रशासनाने पैसे न भरल्याने गाळे सील केले होते. 

चौकट 
पैसे न भरणाऱ्या 100 जणांची यादी 
महापालिकेने नुकसान भरपाईच्या नोटिसा बजावल्यानंतर पैसे भरण्याची मुदत गाळेधारकांना दिली होती. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 600 गाळेधारकांमध्ये काहींनी पूर्ण तर काहींनी काही प्रमाणात पैसे भरले आहे. तसेच काही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. परंतु 100 गाळेधारकांनी पैसे भरण्याबाबत कोणतीही हालचाल केली नाही, अशांची यादी तयार केली असून, या गाळेधारकांवर कारवाई लवकर करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news muncipal corportion market shop issue