बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

बोदवड ग्रामीण रुग्णालय सलाईनवर 

बोदवड : येथे तालुका ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात तालुक्यातील ५२ खेडे जोडलेले असुन या खेड्यातील गोरगरीब नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात. परंतु रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा नाहीत, तसेच अपुरे कर्मचारी असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दण्ड सहन करुन उपचार घ्यावे लागतात. याकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था पुरती कोलमडली आहे. येथील बेड फाटलेले, शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था नाही. इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या अवस्थेत आहे. रुग्णालयात पुरेसे पंखे नाहीत, जे आहेत त्यातील काही पखे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रुग्णांना उकाडा असह्य होतो. इलेक्ट्रॉनिक बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहे. भिंतीवर शैवाळ आल्याने प्लास्टर निघत आहे. २०१७ ते २०१८ या वर्षात रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी तीस लाख रुपये खर्च करण्यात आला होता. या कामाची देखभाल दुरुस्तीची मुदत सात वर्षापर्यंत आहे. तरी देखील दुरुस्ती केली जात नाही. 

रुग्णालयाला लागली गळती 
मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने रुग्णालयाच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे पाऊस आल्यास रुग्णालयात पाणीच पाणी होते. वैद्यकीय अधिकारी यांची तपासणी खोली ते रुग्णांच्या वॉर्ड मध्ये सुध्दा पाणी गळती होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुग्णालय प्रशासनाने मागील काळात पत्र व्यवहारकरुन दुरुस्तीची मागणी केली होती. या बाबतीत बांधकाम विभागाने ठेकेदाराला पत्र देऊन दुरुस्ती करण्याची सूचना केली असता, ठेकेदाराने देखील वरवर कामे केली. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना भरती करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना ऐणगाव (ता. बोदवड) उपकेंद्र अथवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. या विषयाकडे गांर्भियाने लक्ष देऊन बांधकाम विभागाने या समस्या निवारण्याची मागणी होत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon news bodwad rugnalay salainvar